साई संस्थानचा निर्णय Print

भक्तांनी अर्पण केलेल्या वस्तूंचा लिलाव होणार
वार्ताहर , राहाता
श्रीसाईबाबांना भक्तांनी दान केलेल्या सात ते आठ कोटी रुपये किमतीच्या सोने, चांदी व हिरे तसेच मौल्यवान खडे आदी वस्तूंचा तीन टप्प्यात लिलाव करण्याचा निर्णय संस्थानच्या त्रिसदस्य समितीने घेतला. यामध्ये साईबाबांचे चांदीचे सिंहासन व पादुकांसह सुमारे ८ कोटी रूपयांच्या वस्तुंचा सामावेश असल्याची माहिती श्रीसाईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी किशोर मोरे यांनी दिली. चांदीच्या वस्तू, मुकूट, अलंकार व दागिन्यांचा लिलाव येत्या दि. १८ ला, सोन्याचे दागिने, मुकूट, नाणी व अलंकार आदींचा लिलाव दि. १ नोहेंबरला व हिरे-जवाहर, मौल्यवान खडय़ांचे मुकूट हार, गंठण, तसेच माणिक रत्न, पाचू वगैरे धातूंच्या वस्तूंचा लिलाव दि. ८ नोहेंबरला होणार आहे.  श्री साईबाबांना भक्तांनी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या वस्तू, अलंकार व प्राकृतिक हिरे, पुष्कराज, नीलम, माणिक, पाचू (पन्ना), पोवळे मोती यांचा सामावेश आहे. तसेच यापूर्वीचे साईबाबांचे चांदीचे सिंहासन, ज्यावर गेली पन्नास ते साठ वर्षे साईबाबांची मूर्ती विराजमान होती त्यासह चांदीच्या पादुका, सोन्या चांदीचे मुकूट, अलंकार, भांडी, हार आदींचाही लिलाव होईल. २२ किलो चांदीचे अलंकार व ८ किलो सोन्याच्या अलंकारासह तीन ते चार कोटी रुपयांच्या हिरेजडीत मौल्यवान जवाहिरांचा सामावेश आहे. सोने, चांदीच्या वस्तू, अलंकार, दागिने, भांडी, तसेच हिरे, जवाहर शासनमान्य मूल्यांकनकडून प्रयोगशाळेच्या मानांकनाप्रमाणे तपासून घेण्यात आले असल्याचे मोरे यांनी स्पष्ट केले. लिलावामध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्यांना दहा हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागेल. लिलावासंबंधीचे सर्व अधिकार साईबाबा संस्थानने राखून ठेवले आहेत. सोने, चांदी, हिरे, जवाहरांची यादी संस्थानच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.