‘लग्नाची वयोमर्यादा कमी करा’ Print

‘खाप’ची सूचना, चौतालांचा पाठिंबा
पीटीआय, चंदीगढ

बलात्काराचे वाढते प्रकार रोखण्यासाठी मुला- मुलींच्या लग्नाची वयोमर्यादा कमी करण्यात यावी, अशी सूचना खाप पंचायतीने केली आहे. हरियानाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौताला यांनी या सूचनेला बुधवारी पाठिंबा दिला.दरम्यान, राज्यात आणखी एका दलित मुलीवर बलात्कार झाल्याचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. गेल्या महिन्याभरातील राज्यातील बलात्काराची ही पंधरावी घटना आहे. राज्यातील बलात्काराच्या वाढत्या प्रकाराच्या निषेधार्थ चौताला यांनी राज्यपाल जगन्नाथ पहाडिया यांना निवेदन दिले. त्यानंतर ते म्हणाले, ‘‘काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी जिंद जिल्ह्यातील अत्याचारग्रस्त मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेत असतानाच दिवसभरात बलात्काराच्या चार घटना घडल्या.’’विवाहाची वयोमर्यादा कमी केल्यास बलात्काराच्या गुन्ह्यांना आळा घालता येईल, अशी सूचना खाप पंचायतीने केली आहे. सोळाव्या वर्षीच मुलामुलींचे लग्न झाले पाहिजे, यामुळे ती भरकटणार नाहीत आणि त्यातून बलात्काराच्या घटना घटतील, असे खाप पंचायतीचे सदस्य सुबे सिंग यांनी म्हटले होते. या सूचनेला चौताला यांनी पाठिंबा दिला असून, त्यासाठी विधानसभेचे खास अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे.