बचतीचे भूत मानगुटीवर, नव्या फतव्याची दहशत! Print

‘लोकसत्ता’च्या  वृत्ताने खळबळ
प्रदीप राजगुरू , औरंगाबाद
दहा रुपयांत बचतीचे नवे खाते उघडाच, याचे भूत टपाल विभागाच्या मानगुटीवर चांगलेच स्वार झाले आहे! शंभर-दोनशेच नव्हे, यापेक्षाही वरच्या (पाचशेच्या!) पटीत, तेही येत्या काही दिवसांत ही खाती उघडाच, नपेक्षा दिवाळीनिमित्त डाकसेवकांना मिळणाऱ्या बोनसवर पडणारा ‘अलिखित दरोडा’ यंदाही चुकणार नाही, अशी गर्भित धमकी देणारा फतवाच टपाल खात्याने ग्रामीण डाकसेवकांना रवाना केला आहे! जिल्हा प्रवर अधीक्षकांच्या फतव्याची भाषाही ‘जर-तर’ची असल्याने बचतीच्या असह्य़ दुष्टचक्रातून आम्हाला एकदाचे सोडवा हो, अशी साद डाकसेवक घालू लागले आहेत. दरम्यान, ‘बचतीच्या नावावर टपाल खात्याची खाबूगिरी!’ हे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध होताच अनेक डाकसेवकांनी आपल्यावरील अन्यायाचा पाढाच या प्रतिनिधीशी दूरध्वनीवर बोलताना वाचला. येत्या काही दिवसांत (दि. १३पर्यंत!) प्रत्येकी १० रुपये भरून १००-२००जणांचे (मोठे गाव वा क्षेत्र असल्यास ३००-४०० वा यापेक्षा जास्तच!) १००-२०० खाते उघडाच, असा हा फतवा आहे. प्रत्येक दहा रुपयांप्रमाणे १०० वा २०० खाती उघडली की बोनसच्या पैशातील एक-दोन हजार रुपये त्यासाठी टपाल खात्याकडे आपोआप वळते केले जाणार आणि नवे बचत खाते उघडल्याने टपाल खात्याला नव्या बचत खात्यापोटी प्रत्येकी १५२ रुपये मलई मिळणार! अधिकाऱ्यांनाही प्रमोशन वा तत्सम इन्सेन्टिव्ह ठरलेले.  एकदा भरलेले १० रुपये डाकसेवकांना ३ वर्षांनी व्याजासह दिले जातात असे सांगण्यात येते.  बचत खात्याबरोबरच ग्रामीण डाकजीवन विमा योजनेची पॉलिसी (आरपीएलआय) उतरविण्यासाठीही याच फतव्याद्वारे डाकसेवकांना भरीस घातले आहे! येत्या शनिवारी (दि. १३) लाभार्थीचे गाववार मेळावे घेऊन किमान १५ नव्या पॉलिसी उतरविण्याची सक्तीच केली आहे. पूर्वी ही पॉलिसी एक लाखाची असे. आता ती दहा हजार रुपयांची केली. त्याचा हप्ता दर महिन्याला १४ रुपये असा माफक ठेवला आहे. पॉलिसीची मुदत मात्र तब्बल ४०-४२ वर्षांची आहे! परंतु बचत खात्याप्रमाणेच या पॉलिसीचा पहिला हप्ताही डाकसेवकांच्या पैशातूनच भरून घेतला जातो. एकतर अशी पॉलिसी उतरविण्यास कोणी फारसे इच्छूक नसते. परंतु अधिकाऱ्यांच्या गळ्यात घंटा बांधायची कोणी? बचतीचे खाते उघडण्यास भरलेले पैसे ३ वर्षांनी का होईना पुन्हा मिळण्याची हमी असते. परंतु या पॉलिसीसाठी भरलेले पैसे एकदा भरले की संपले! कारण पुढचे हप्ते थकतात आणि पॉलिसी बंद पडते. आर. डी. व आरपीएलआय यांचे कागदोपत्री उद्दिष्ट गाठल्याची टिमकी वाजवून घेण्यास अधिकारी मोकळे आणि खात्यालाही ‘मलई’चा सोस शांत बसू देत नाही, अशी ही दरोडेखोरी सुरू आहे.    
अन्यायाविरोधात राजीनामे!
तब्बल ३५-३८ वर्षे इमाने-इतबारे डाकसेवक म्हणून काम करूनही जाच सुरूच राहणार असेल तर आम्ही करायचे तरी काय, असा उद्विग्न सवाल सातारा व नगर जिल्ह्य़ांतील काही त्रस्त डाकसेवकांनी या प्रतिनिधीशी बोलताना केला. ‘सेवेची’ आमची अजून काही वर्षे बाकी असली, तरी झाले तेवढे खूप मानून आम्ही आमचे राजीनामेच देऊन ठेवले आहेत. टपाल खात्याविषयी प्रतिमा चांगली असली, तरी आमची होणारी घुसमट कधी तरी बाहेर यायलाच हवी, अशी बोलकी प्रतिक्रिया या वर्गातून उमटत आहे.