सीबीएसई बोर्ड आयोजित तायक्वांडो स्पर्धेत रायगडचे सुयश Print

खोपोली, ११ ऑक्टोबर
सेंट्रल बोर्ड सेकंडरी एज्युकेशन तथा सीबीएसई बोर्डाच्या पश्चिम विभागीय तायक्वांडो स्पर्धा ३ ते ६ ऑक्टोबरदरम्यान जयपूर (राजस्थान) येथील चित्रकूट पब्लिक स्कूलमध्ये संपन्न झाल्या. या स्पर्धेत रायगड जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांनी एक सुवर्ण व पाच रौप्य पदके पटकावून नेत्रदीपक कामगिरी केली आहे. पश्चिम विभागामध्ये महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात इत्यादी राज्यांचा समावेश होतो. या राज्यांतून एकूण ६८५ स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते.
विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या एकूण ४४ वजनी गटात या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत पनवेलस्थित न्यू होरायझन पब्लिक स्कूलचा तायक्वांडोपटू विद्यार्थी कबीर भक्ता याने २७ ते २९ किलो वजनी गटात प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक पटकावले. पनवेलच्या सेंट जोसेफ हायस्कूलचा तायक्वांडोपटू हिमांशू विसाळे (२९ ते
३२ किलो गट), लोधिवली- खालापूर येथील जे. एच. अंबानी स्कूलची तायक्वांडोपटू विद्यार्थिनी उन्नती दुबे (३५ ते ३७ किलो वजन गट), पनवेलच्या न्यू होरायझन पब्लिक स्कूलचा तायक्वांडोपटू रवी नाग (५४ ते ५९ किलो वजन गट), पनवेलच्या डी.ए.व्ही. पब्लिक स्कूलचा तायक्वांडोपटू साहिल पाटील (४८ ते ५१ किलो वजन गट) व पनवेलच्या न्यू होरायझन पब्लिक स्कूलची तायक्वांडोपटू विद्यार्थिनी सायली कुचेकर (३२ ते ३५ किलो वजन गट) यांनी या स्पर्धेत आपापल्या वजन गटात द्वितीय क्रमांकासह रौप्यपदक पटकावण्याचा बहुमान संपादन केला. रायगड जिल्ह्य़ाच्या नावलौकिकात व आपापल्या शाळांच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या या विजेत्या तायक्वांडोपटू विद्यार्थी व विद्यार्थिनीची सीबीएसई बोर्डाच्या १९ ते २२ नोव्हेंबरदरम्यान हरियाणा येथे संपन्न होणाऱ्या राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेसाठी पश्चिम विभागीय संघात निवड घोषित करण्यात आली आहे. या विजेत्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पंच तथा पनवेलच्या न्यू होरायझन पब्लिक स्कूलचे क्रीडा शिक्षक सुभाष पाटील यांचे मार्गदर्शन लाभले होते. विजेत्या तायक्वांडोपटूंचे त्यांच्या शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व  संस्थाचालकांनी खास अभिनंदन केले असून, राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.