कर्जतला आज भात बीजोत्पादक प्रगतशील शेतकऱ्यांचा मेळावा Print

कर्जत, ११ ऑक्टोबर
कर्जतला आज, १२ ऑक्टोबर रोजी किरवली येथील शेळके सभागृहामध्ये सकाळी ११.३० वाजता भात बीजोत्पादक प्रगतशील शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. ई. लवांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडणार आहे. विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध भात जातींची लागवड प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राने खरीप हंगामात केली असून, शेतकऱ्यांनी सदर प्रक्षेत्रांना प्रत्यक्ष भेटी देऊन माहिती घ्यावी आणि मोठय़ा प्रमाणात दर्जेदार बीजोत्पादन घ्यावे हा या मेळाव्याचा प्रमुख उद्देश आहे, अशी माहिती विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. रवींद्र मर्दाने यांनी दिली आहे. सदर मेळाव्यास महाबीजचे महाव्यवस्थापक (उत्पादन) एस. एम. पुंडकर, विभागीय व्यवस्थापक ए. एल. सोनोने, सहयोगी संशोधन संचालक डॉ. बी. एल. ठवरे, उपविभागीय व्यवस्थापक ए. एल. तपासे, कोकण विभागातील महाबीजचे अधिकृत विक्रेते, बियाणे कंपन्यांचे प्रतिनिधी, भात बीजोत्पादक, शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य आणि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कर्जत तालुक्याच्या सापेले येथील ७० शेतकऱ्यांना एकत्र आणून ५०.४ हेक्टर क्षेत्रावर ‘रत्ना’ या भात वाणाला पर्याय असणारी ‘कर्जत-७’ या वाणाची लागवड करण्यात आली आहे. सदर शेतकऱ्यांना बियाणे, खते,
कीटकनाशके यांचा पुरवठा कृषी विद्यापीठाकडून विनामूल्य करण्यात आला आहे. सुधारित ड्रमसीडरने भातपेरणी व सामूहिक शेतीचा आदर्श सापेले ग्रामस्थांनी
अन्य शेतकऱ्यांसमोर ठेवला असल्याने कुलगुरू डॉ. लवांडे आणि महाबीजचे सर्व अधिकारी सापेले या गावास भेट देणार आहेत. किरवली येथील शेळके
सभागृहामध्ये सकाळी ११.३० वाजता होणाऱ्या या मेळाव्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे विस्तार
शिक्षण अधिकारी डॉ. रवींद्र मर्दाने यांनी केले आहे.