इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्यांस रिक्षाचालकांकडून मारहाण; एकास अटक Print

प्रतिनिधी, वसई

मीरारोडमधील रिक्षाचालक आणि त्यांच्या संघटनेची मनमानी भाडेवसुली व मुजोरी सातत्याने वाढत असून, याविषयी तक्रारी व जनजागृती करणाऱ्या ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’च्या एका कार्यकर्त्यांस गुरुवारी रिक्षाचालकांनी रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली. या प्रकरणी एका रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्या साथीदारांचा शोध चालू आहे. रिक्षाचालकांच्या मुजोरीविरुद्ध गेल्या वर्षभरापासून जनजागृती करणारे व मंत्रालयापर्यंत तक्रारी करणारे इंडिया अगेन्स्ट करप्शनचे कार्यकर्ते राकेश सरोगी यांना गुरुवारी सकाळी ११ वाजता सुनील नायक रिक्षाचालकाने दमदाटी करत मारहाण केली. नंतर इतर रिक्षाचालकांनीही राकेश यांना रक्तबंबाळ होईपर्यंत बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे राकेश यांना सोडवायला ना प्रवासी आले, ना पोलीस. जवळ शांतीनगर पोलीस चौकी असूनही मारपीट चालूच होती. एका रिक्षाचालकाला अटक करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांनी सांगितले.