पुणे.. इंडियन मुजाहिदिनचा प्रमुख तळ Print

 

प्रतिनिधी, पुणे
इंडियन मुजाहिदिन (आयएम) या नावाने दहशतवादी कृत्ये करणारी संघटना ही पुण्यात अजूनही मोठय़ा प्रमाणातच सक्रिय असल्याचे पुण्यात १ ऑगस्ट रोजी झालेले साखळी बॉम्बस्फोटांची घटना आणि या घटनेच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. हा संपूर्ण कट रचणे, त्याची तयारी आणि त्याची कार्यवाहीसुद्धा याच संघटनेच्या लोकांनी केल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

या घटनेत मराठवाडय़ातील दोन आरोपींबरोबरच पुण्यातील शुक्रवार पेठेत राहणारा फिरोझ अब्दुल सय्यद याला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या संघटनेचा पुण्यात तळ असल्याचे आणि जाळेसुद्धा कायम असल्याचे स्पष्ट झाले. त्यांचे दहशतवादी सक्रिय असल्याचेही पाहायला मिळाले.
जहाल जिहादी दहशतवाद्यांनी सुरू केलेल्या स्टुडन्ट्स इस्लामिक मूव्हमेन्ट ऑफ इंडिया (सीमी) या संघटनेने गेल्या दशकात अनेक दहशतवादी कृत्ये घडवून आणली. त्याचबरोबर अल्पसंख्याकांच्या भावना भडकावून तरुणांना या संघटनेकडे आकर्षित करण्याचे काम मोठय़ा प्रमाणावर केले. ‘सीमी’ संघटनेने पुण्यात दाट जाळे विणले होते. त्यांच्या कारवायांमुळे या संघटनेवर बंदी घालण्यात आली. सीमीवरील बंदीनंतर तिच्या सदस्यांनी नाव बदलले. त्यांनी ‘इंडियन मुजाहिदिन’ (आयएम) या नावाने कारवाया सुरू केल्या. मात्र, हे दहशतवादी पुण्यात दहशतवादी कृत्ये करत नसल्याचे समजले जात होते. परंतु, पुण्यात १३ फेब्रुवारी २०१० रोजी झालेल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाने हा समज खोटा ठरवला. या स्फोटात मोहसिन चौधरी या पुण्यातील दहशतवाद्याचा हात होता आणि तो अद्यापही फरार आहे.
इंडियन मुजाहिदिन हे नाव घेतल्यानंतर या संघटनेने जर्मन बेकरी बॉम्बस्फोट घडविला. याचबरोबर त्याच सुमारास दगडूशेठ हलवाई मंदिराजवळही बॉम्ब पेरण्याचा प्रयत्न केला. हे उद्योग करणारा कतिल सिद्दिकी त्यासाठी कोंढवा परिसरात राहिला होता.