पक्ष रुजविण्यासाठी केजरीवाल समर्थकांची धडपड Print

प्रतिनिधी, नाशिक
भ्रष्टाचार विरोधातील नेते अरविंद केजरीवाल यांच्या राजकीय पक्षाचे नाव अद्याप निश्चित झाले नसताना इंडिया अगेन्स्ट करप्शन मोहिमेतील त्यांच्या सहकाऱ्यांनी जनजागृतीसाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी येथील हुतात्मा स्मारकात त्यांनी बैठक घेऊन भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलनाची दिशा ठरविणे, पक्षाची रचना, राजकीय पक्ष म्हणून केजरीवाल यांचा पक्ष नेमकी काय भूमिका निभावेल, याबाबत स्थानिक पातळीवरील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
या बैठकीस संजय परमार, राष्ट्र सेवा दलाचे सुभाष वारे, गजानन खातू, मयांक गांधी यांच्यासह डॉ. गिरीधर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. बैठकीत वारे यांनी अण्णांच्या आंदोलनाला लागलेले वळण, राजकीय वलयाची आवश्यकता याबाबत माहिती दिली. लोकपाल बिलासाठी तुम्ही केंद्रात निवडून या आणि लोकपाल मंजूर करा, असे आवाहन केल्यामुळे केजरीवाल यांनी राजकीय प्रवेश निश्चित केल्याचे वारे यांनी सांगितले. राजकारण हा व्यापक विषय असून जीवनाच्या विविध विषयाला स्पर्श करतो. भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलनाला नंतर आपल्या क्षमतांचा आवाका लक्षात आल्याने भविष्यात झेप घेण्याची संधी प्राप्त झाली आहे. सत्ता मिळविण्यासाठी हा संघर्ष नसून ही एक क्रांती आहे. या माध्यमातून सामाजिक परिवर्तनासाठी आंदोलन, विधायक कार्य, संघर्ष करता येईल, अशी धारणा आहे. राजकारणाला दिशा देण्यासाठी आम्ही या क्षेत्रात उतरत आहोत, असेही ते म्हणाले. आपल्यातील चांगले लोक सत्तेत येऊन जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सेवकाच्या भूमिकेत राहतील, ते जबाबदारीने काम करतील तसेच त्यांच्या कामात पारदर्शकता असेल. यासाठी सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. राजकारण एक कला आहे, ते एक शास्त्र आहे हे विसरून चालणार नाही. पक्ष सक्रिय होण्यासाठी लवकरच सभासद नोंदणी सुरू होईल, मात्र सभासदांना पक्षाच्या वतीने कुठल्याही प्रकारचे ओळखपत्र दिले जाणार नाही, पक्षाच्या माध्यमातून सत्ता-पैसा यातील भ्रष्टाचार थांबविण्यासाठी प्रयत्न होतील, उमेदवाराची जनमानसातील प्रतिमा पडताळून घेतली जाईल आदी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, पक्ष संघटनेच्या दृष्टीने केजरीवाल यांची टीम व समविचारी संघटना यांनी राज्यात पुणे व औरंगाबाद येथे यापूर्वी बैठका घेतल्या आहेत. नजीकच्या काळात नागपूर येथे बैठक होणार असून २१ ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय समिती गठित करण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत नाशिकचे साधारणत: १५ ते २० सदस्य सहभागी होतील, असे ठरविण्यात आले.