डॉ. विजय केळकर समिती आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर Print

अभिमन्यू लोंढे, सावंतवाडी
प्रादेशिक समतोल विकास समितीचे अध्यक्ष डॉ. विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखालील समिती सिंधुदुर्ग दौऱ्यावर उद्या शनिवार, १३ ऑक्टोबर रोजी येत आहे. त्या वेळी कृषी-फलोद्यान, पर्यटन व मच्छीमारी या त्रीसूत्रीतून कोकणपण राखत विकास करण्याची मागणी अनेक जण करणार आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाच्या समतोल विकासाची गाऱ्हाणी ही समिती ऐकून घेणार आहे.
डॉ. विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीत १२ तज्ज्ञांचा समावेश आहे. ही समिती सिंधुदुर्गनगरी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या सूचना ऐकून घेणार आहे. तसेच निवेदनेही स्वीकारणार आहे.
कृषी-फलोद्यान, पर्यटन व मच्छीमारी या माध्यमातून समतोल विकास साधताना कोकणपण टिकविण्याची मागणी करणार आहेत. अ‍ॅग्रो पर्यटन अंतर्गत बागायती व शेतीलाही पर्यटन दर्जा देण्याची मागणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
कोकणात पर्यटन फलोद्यानला व मत्स विकास साधताना पर्यटन पूरक व्यवसाय व प्रक्रिया उद्योगांना प्राधान्य द्यावे, तसेच अन्न प्रक्रिया उद्योगाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याची मागणी केली जाणार आहे. आंबा, काजू, कोकम, फणस, जांभूळ, करवंदे, नारळ अशा फळांवर प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्माण करण्यासाठी शासनाची पॉलिसी महत्त्वाची आहे.
वेधशाळा, विद्यापीठाचे केंद्र, रोजगाराभिमुख कोकणावर आधारित अभ्यासक्रम व्हावेत, तसेच पश्चिम घाट आणि कोकणच्या सागरीकिनाऱ्याचे संरक्षण व संवर्धन व्हावे म्हणूनही सरकारचे धोरण महत्त्वाचे आहे. पर्यटन विकास साधतानाच वनौषधी संवर्धन, संशोधन व अभ्यासकेंद्र निर्माण झाल्यास अनेक जण ३०० प्रकारच्या औषधी वनस्पतींचे जतन व संवर्धन करतील. त्यावर आधारित प्रकल्पही महत्त्वाचे आहेत.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि सागरी महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यास दळणवळणाचे साधन वाढेल. त्यामुळे अनेक प्रकल्प कोकणात येतील, शिवाय कोकण रेल्वे मार्ग दुपदरीकरण करतानाच मुंबई ते सावंतवाडीपर्यंत खास रेल्वे, पॅसेंजर गाडी सोडावी म्हणूनही मागणी होईल. शिवाय हॉटेल व्यवसाय करणाऱ्यांसाठी लागणाऱ्या अंडी, मटण, भाजीपाला, दूध व अन्य वस्तूंची निर्मिती या भागातच झाल्यास रोजगाराची अनेक दालने निर्माण होतील.
कर्नाटक व गोवा राज्याच्या सीमेवर असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात नैसर्गिक साधनसंपत्ती असल्याने विकासासोबतच सरकारी रुग्णालये अद्ययावत व्हावीत. ट्रॉमा केअर सेंटर निर्माण व्हावीत, तसेच गोवा बांबुळी, बेळगाव केईली, कोल्हापूर, मुंबईकडे जाणाऱ्या रुग्णांना या ठिकाणी सेवा उपलब्ध करून जीवदान द्यावे म्हणून मागणी होईल.
रत्नागिरी-सिंधुदुर्गचा सर्वागीण विकास साधणारे पाटबंधारे प्रकल्पाच्या सिंचनाचे क्षेत्र विकसित करण्यासाठी खास योजना आखण्याची गरज आहे. अन्न प्रक्रिया उद्योगाशी नाळ जोडणारा विकास या भागात झाल्यास देश-विदेशात उत्पादनाला बाजारपेठ मिळतील अशा शिफारशी कराव्यात, अशा मागण्या होणार आहेत.
याशिवाय प्रचंड महागाईच्या काळात स्वयंस्फूर्तीने काही उत्पादने निर्माण करतानाच गोबर गॅस, कुक्कुटपालन, शेळीपालनसारखी निर्मिती अपेक्षित आहे. मत्स्य विकास व प्रक्रिया उद्योग उभारताना विद्यालय निर्माण करावे, तसेच कोकण कृषी विद्यापीठाने थेट शेतकऱ्यांच्या दारात जाऊन नवनवीन संशोधन सादर करावे म्हणूनही मागणी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
कोकणपण राखत विकास करताना आर्थिक सुबत्ता यावी म्हणून विविध प्रकल्पांच्या कल्पना या समितीसमोर ठेवल्या जाणे अपेक्षित आहे, असे सांगण्यात आले.