इम्रानच्या साथीदारांचा शोध सुरू Print

मुसक्या आवळल्यानंतर पित्याची बेपत्ता असल्याची तक्रार!
वार्ताहर, नांदेड, शनिवार, १३ ऑक्टोबर २०१२

पुण्यात १ ऑगस्टला झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात दिल्ली पोलिसांनी अटक केलेला व मूळचा नांदेडचा रहिवासी असलेला इम्रानखान वाजिदखान (वय ३१) याच्या साथीदारांचा दहशतवादविरोधी पथकाने शोध सुरू केला आहे. विशेष म्हणजे इम्रानच्या मुसक्या आवळल्यानंतर तो बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी गुरुवारी दुपारी विमानतळ पोलीस ठाण्यात नोंदविली!

 

पुणे बॉम्बस्फोट प्रकरणात दिल्ली पोलिसांनी असदखान, इम्रानखान व सईद फिरोज या तिघांना गुरुवारी अटक केली. त्यांच्याकडून स्फोटके व अन्य शस्त्रे जप्त केली. दिल्ली पोलिसांच्या या कारवाईने मराठवाडय़ात मोठी खळबळ उडाली. काही दिवसांपूर्वी दहशतवादविरोधी पथकाने नांदेडच्या मो. इलियास, मो. मुजम्मील, मो. इरफान व मो. सादिक या चौघांना, तर मो. अक्रम याला बंगलोर पोलिसांनी अटक केली होती. नांदेडच्या ५ तरुणांना दहशतवादी कारवायांत अटक केल्यानंतर गृह विभागातील वरिष्ठ अधिकारी खडबडून जागे झाले होते.
दिल्ली पोलिसांनी ज्या तिघांना अटक केली, त्यापैकी दोघे मराठवाडय़ातील आहेत. असदखान औरंगाबादचा, तर इम्रानखान नांदेडचा रहिवासी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर काल दुपारपासूनच दहशतवादविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या नातेवाइकांची कसून चौकशी केली. नांदेडचा मूळ रहिवासी असलेला इम्रानखान हा माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांनी स्थापन केलेल्या शारदा भवन शिक्षण संस्थेच्या यशवंत महाविद्यालयातला विद्यार्थी होता. सन १९९६ ते ९८ दरम्यान तो या महाविद्यालयात होता. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तो औरंगाबादच्या विधी महाविद्यालयात एलएल.बी. शिक्षणासाठी गेला. कायद्याची पदवी त्याने पूर्ण केली नाही. पण बेकायदा कारवायांत पूर्ण गुंतला.
मूळचा बीडचा रहिवासी असलेला व लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी फय्याज अहमद कागजी हा परदेशात राहून मराठवाडय़ातल्या काही तरुणांना दहशतवादी कारवायांसाठी भरीस घालत असल्याचे यापूर्वीही उघड झाले होते. इक्बाल व रियाज या भटकळ बंधूंच्या आदेशावरूनच इम्रानला दहशतवादी कारवायांसाठी आकर्षित करण्यात आले असावे, असा अंदाज आहे.
मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांवर प्रभुत्व असलेल्या इम्रानखानचे वडील एस.टी. महामंडळात आगारप्रमुख होते. इम्रानला तीन भाऊ आहेत. पैकी समीरखान बँकेत, तैवर औरंगाबादच्या न्यायालयात व तौफिक औरंगाबाद येथेच बेकार आहे. त्याच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीवरून तो गेल्या ४ सप्टेंबरपासून घरातून गेला तो परतला नाही. सर्व नातेवाइकांकडे शोध घेतला, पण तो आढळला नाही. तो दहशतवादी कारवायांत सहभागी आहे की नाही, त्याला अशा कारवायांसाठी कोणी जाळय़ात ओढले याबाबत त्याचे नातलग बोलण्यास तयार नाहीत. इम्रान सौदी अरेबियात जाऊन आला होता. तेथे गेल्यानंतरच तो अशा कारवायांसाठी तयार झाला असावा, असा पोलिसांचा कयास आहे. नांदेड मनपा निवडणुकीतील काँग्रेसच्या एका उमेदवाराशी त्याचे नातेसंबंध असल्याचा गौप्यस्फोट मनपाच्या एका विद्यमान पदाधिकाऱ्याने केला.इम्रानला अटक झाल्यानंतर नांदेडच्या दहशतवादी पथकाने गुरुवारी दुपारी, रात्री त्याच्या घराची झडती घेतली. त्याच्या नातेवाइकांची चौकशीही केली. पण चौकशीतून फारसे काही निष्पन्न झाले नाही. नातेवाइकांच्या चौकशीनंतर आता इम्रानच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. राज्याच्या गृहदप्तरी अतिसंवेदनशील अशी नोंद असलेल्या नांदेड शहरात आता दहशतवादी कारवायात सहभागी झालेल्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. इम्रानला आणखी कोणाची साथ होती का? किंवा इम्रान ज्या मार्गाने गेला त्या मार्गावर आणखी कोणी आहे का? याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.    

असदचे नगर कनेक्शन!
इम्रान औरंगाबाद, पुण्यासह अहमदनगर जिल्हय़ांतल्या काही तरुणांच्या संपर्कात होता. असदचा एक मेहुणा नगरला राहतो. तो या तिघांच्या संपर्कात आला होता, अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. इम्रानच्या मोबाईलवर संपर्क झालेल्या सर्व कॉल्सचा सविस्तर तपशील एटीएसने मुंबई वरिष्ठ कार्यालयाला पाठविल्याचे कळते.