महाड तालुक्यात शिवसेना-शेकाप युतीचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता!-आ.भरत गोगावले Print

महाड,
महाड तालुक्यामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकींत शिवसेना शेतकारी कामगार पक्षाचे उमेदवार सर्वात जास्त निवडून येतील असा अंदाज व्यक्त करताना काँग्रेस राजवटीत सर्वसामान्य नागरिकाला महागाईमुळे जगणे अशक्य झाले असल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला जातो. त्याचे पडसाद ग्रामीण भागांतही उमटले आहेत. त्याचा परिणाम ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर होणार असल्यामुळे काँग्रेसला मतदार नाकारीत असल्याचा दावा आ. भरत गोगावले यांनी केला. तालुक्यांतील बहुसंख्य ग्रामपंचायतींवर शिवसेना शेकाप युतीचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास त्यांनी महाडमध्ये ओयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यक्त केला.
    शहरातील सर्वसामान्य नागरिकांना महागाईची प्रचंड झळ बसलेली असताना राज्य शासनाच्या कारभाराविरोधात जनक्षोभ दिवसें दिवस वाढत आहे, त्याचे पडसाद ग्रामीण भागांतही उमटले असल्याने २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकींमध्ये त्याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाहीत. तालुक्यांतील ७३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर २७ पंचायती बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामध्ये १५ पेक्षा अधिक पंचायती शिवसेनेच्या असल्याचा दावा आ. भरत गोगावले यांनी केला. राहिलेल्या ४६ ग्रामपंचायतींपकी ३५ ग्रामपंचायती शिवसेना शेकापच्या ताब्यात येतील असा ठाम विश्वास व्यक्त करताना ते म्हणाले विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी ग्रामीण भागांतील मतदारांमध्ये काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाविषयी तीव्र नाराजी आहे. त्याचा फायदा आम्हाला मिळणार असल्याने तालुक्यांतील सुमारे पन्नासपेक्षा अधिक ग्रामपंचायतींमध्ये युतीचे सदस्य दिसून येतील. त्याशिवाय अनेक पंचायतींमधून सदस्य बिनविरोध निवडून आलेले आहेत, त्यामध्येदेखील युतीला पाठिंबा देणारे सदस्य अनेक आहेत. त्याचा फायदा सरपंचाच्या निवडणुकींमध्ये होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी मतदानाच्या दिवशी अधिकाधिक मतदान कशा प्रकारे केले जाईल याकडे अधिक लक्ष द्यावे, तसेच मतदारांना योग्य मार्गदर्शन करावे असे आवाहन आ.गोगावले यांनी केले.