प्रयोगातून विज्ञानाची गोडी आणण्याचा नगरपरिषद शाळांचा प्रयत्न Print

मुरुड,
विज्ञान हा विषय तसा किचकटच परंतु जर हा विषय प्रत्यक्ष प्रयोगातून विद्यार्थ्यांना दाखवला तर निश्चितच विद्यार्थी याकडे आकर्षिले जातात व प्रयोगातून विषय समजून घेतात. वैज्ञानिक भाषा तशी किचकट वेगवेगळ्या शास्त्रज्ञांची अवघड नावे, क्लिष्ट असे प्रायोगिक साहित्य अशा असंख्य समस्यांवर विद्यार्थ्यांना मात करता यावी यासाठी मुरुड नगरपरिषद शाळांकडून प्रयोगातून विज्ञानाची गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नुकतीच नगरपरिषद शाळा क्र. दोनने इयत्ता ५ वी ते ७ वीमधील विद्यार्थ्यांसाठी सातत्यपूर्ण र्सवकष मूल्यमापन पद्धतीअंतर्गत विज्ञान प्रयोगांचे आयोजन केले होते. या वेळी शाळेच्या प्रशस्त हॉलमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांला प्रयोगाचे साहित्य देण्यात आले होते. या वेळी विज्ञानाच्या पाठय़पुस्तकातील ‘ज्वलनास ऑक्सिजनची गरज’, वनस्पतींचे विविध अवयव ओळखणे, वनस्पतींची मुळे पाणी शोषतात, लोहचुंबकांच्या साह्य़ाने लाकडाच्या भुषातून लोखंडी कण गोळा करणे, गाळण पद्धतीने पाणी शुद्ध करणे आदींसह प्रयोग देण्यात आले होते. या प्रयोगांची विद्यार्थ्यांनी व्यवस्थित तयारी केली होती व प्रयोग पाहावयास येणाऱ्यांना उत्कृष्ट माहिती देत होते. याबाबत अधिक माहिती देताना या शाळेचे मुख्याध्यापक- राजेश भोईर यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना विज्ञान हा विषय खूप अवघड वाटत असतो, परंतु या विषयात त्यांना गोडी निर्माण होण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांकडून सदरील प्रयोग प्रथम त्यांना करवून दाखवले व तद्नंतर त्यांच्याकडून प्रत्यक्षात ते करून घेतले. या मागचा उद्देश एवढाच आहे की, विद्यार्थ्यांची भीती नाहीशी होऊन त्यांच्यात विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी. याची प्रचीती सर्वाना विज्ञान प्रदर्शनातून आली आहे. या उपक्रमाचे श्रेय मुख्याध्यापक भोईर यांनी सायली गुंजाळ, मनीषा फाटक, संध्या नागे, कल्पना पेणकर, अविनाश ठाकूर व दीपाली जाधव या सर्व शिक्षकांना दिले. केंद्रप्रमुख आगरदांडा- सुनील जंजिरकर, नगरपरिषद केंद्रप्रमुख- अनंत आगलावे, महेश कवळे, जीवन तेलंगे, रुपेश बांद्रे, धनंजय म्हात्रे व पत्रकार मंडळी यांनी हे प्रदर्शन पाहून या उपक्रमाची खूप प्रशंसा केली आहे.