वाणगावचा भूखंड आदिवासी महिलांच्या स्वाधीन Print

ठाणे, १६ ऑक्टोबर
वाणगाव येथील रेल्वे फाटकाच्या पूर्वेकडील आदिवासी शेतकऱ्याला दिलेल्या जमिनीवर केलेल्या अतिक्रमणचा लढा आदिवासी महिला देवकू काठय़ा आणि रेखा काठय़ा यांनी जिंकल्याने अप्पर जिल्हाधिकारी जव्हार यांच्या आदेशाप्रमाणे तहसीलदार महेश सागर यांनी काल दूर करून हा भूखंड आदिवासी महिलांच्या स्वाधीन केला.
वाणगाव पाटीलपाडा रेल्वे फाटकाच्या पूर्वेकडे सव्‍‌र्हे नं. ९२/७ या भूखंडावर बिगर आदिवासींनी अतिक्रमण करून कॅबिन उभारून व्यवसाय सुरू केले होते त्यामुळे ही जमीन मोकळी करून मिळण्यासाठी भूखंड मालक देवकू काठय़ा आणि रेखा काठय़ा यांनी प्रांताधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी अशा विविध न्यायालयांत सतत आठ वर्षे लढा दिला. हा संघर्ष आदिवासी एकता परिषदेने पाठपुरावा करून लावून धरला होता. त्यानुसार तहसीलदार महेश सागर यांनी १५ ऑक्टोबरला आदिवासी प्रत्यार्पण कायद्यानुसार २ जेसीबी, २ दंगलविरोधी पथके १०० च्या आसपास पोलीस, महसूल कर्मचारी अशा प्रचंड बंदोबस्तात १७ गावे आणि १० टपऱ्या जोडून उद्ध्वस्त केल्या आणि मोकळा भूखंड आदिवासी महिलांच्या ताब्यात दिला.
असे असले तरी या जमिनीवर राहत असलेल्या गाळेधारकाच्या म्हणण्याप्रमाणे २५ वर्षांपूर्वी येथील १० फूट लांब आणि २० फूट रुंदीचा भूखंड ९९ वर्षांच्या कराराने संबंधित आदिवासीकडून भाडेपट्टय़ाने घेतला होता, असे असतानाही या जमिनीचा वाद अप्पर आयुक्त कोकण विभाग मुंबई यांच्या न्यायालयात असतानाही येथील गाळे तोडून आम्हाला उद्ध्वस्त केल्याची प्रतिक्रिया बाबुलाल जैन, प्रकाश हिरालाल आणि लता राऊत यांनी व्यक्त केली.