नरेगा अभियानांतर्गत रायगड जिल्हा समन्वय समितीची बैठक संपन्न Print

प्रतिनिधी , अलिबाग
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हा समन्वय समितीची बैठक अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या वेळी जिल्ह्य़ाचे पालकमंत्री सुनील तटकरे उपस्थित होते. नरेगाअंतर्गत जिल्ह्य़ातील ४२२ ग्रामपंचायतींनी अद्याप ग्रामसभा घेतली नसल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. येत्या पंधरा दिवसांत ग्रामसभा घेऊन ग्रामविकासाचा आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. सुरुवातीच्या संथ प्रतिसादानंतर आता जिल्ह्य़ात रोजगार हमी योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून जास्तीत जास्त मजुरांची नोंदणी करून जॉब कार्ड उपलब्ध करून देण्याचे आवाहन तटकरे यांनी केले.
सुरुवातीच्या थंड प्रतिसादानंतर आता रायगड जिल्ह्य़ातही रोजगार हमी योजनेला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. मात्र आता या योजनेची अधिक व्यापक २०१०-२०११ मध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत केवळ १५ लाख ७९ हजार रुपयांची कामे करण्यात आली होती. मात्र जिल्हा प्रशासनाने यानंतर व्यापक मोहीम राबवून २०११-२०१२ मध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत केलेल्या कामांचे प्रमाण १५ कोटी ३१ लाख रुपयांवर नेले. चालू आर्थिक वर्षांत म्हणजेच २०१२-२०१३ मध्येही जवळपास आठ कोटी ५३ लाख रुपयांची कामे पूर्ण झाली आहे.
यात जिल्हा परिषदेंतर्गत वनराई बंधारे बांधणे, रोपवाटिकांची निर्मिती करणे, रस्ते बनवणे, गाळ काढणे, सिंचन विहिरी बांधणे, तलाव बांधणे आणि ग्रामपंचायत भवनाची उभारणी करणे हा उद्देश होता. तर कृषी विभागाकडूनही वनराई बंधारे बांधणे, रोपवाटिका उभारणे, सीसीटी बंधारे बांधणे आणि भात शेतीतील बांधबंदिस्तीची देखभाल करणे यासारख्या योजनांचा समावेष होता. दिवाळीनंतर जिल्ह्य़ात पुन्हा एकदा या अभियानाला सुरुवात होणार असून जास्तीत मजूर नोंदणी आणि जॉबकार्ड वितरण करण्याची गरज असल्याचे पालकमंत्री सुनील तटकरे यांनी सांगितले. जिल्ह्य़ातील ४२२ ग्रामपंचायतींनी अद्यापही नरेगा अंतर्गत ग्रामसभा घेतलेली नाही. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांत या ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेऊन विकास आराखडा तयार करावा, अशी सूचना तटकरे यांनी केली. या वेळी जिल्हाधिकारी एच. के. जावळे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब मिसाळ हेदेखील उपस्थित होते.