सुंदरला वाचवा! Print

* जोतिबा मंदिरातील हत्तीचा छळ  * सुटकेसाठी ‘पेटा’ सरसावली  * गुरुवारी नागपुरात धरणे
खास प्रतिनिधी , नागपूर
alt

कोल्हापूर जवळच्या जोतिबा मंदिरात साखळदंडाने जखडून ठेवलेल्या १३ वर्षांच्या सुंदर नामक हत्तीच्या सुटकेसाठी आता प्राणीहक्कांसाठी लढा देणाऱ्या ‘पेटा’ने आक्रमक भूमिका घेतली आहे. वनमंत्री पतंगराव कदम यांनी सुंदरच्या सुटकेचे आदेश दिल्यानंतरही मुख्य वनसंरक्षक ए. के. जोशी यांनी या असहाय हत्तीच्या सुटकेसाठी अद्याप प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे वन विभागाच्या सिव्हिल लाइन्समधील मुख्यालयापुढे येत्या गुरुवारी (ता. १८) दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत पेटाचे स्वयंसेवक धरणे आंदोलन करणार आहेत.
सुंदरला एका अंधारकोठडीत साखळदंडांनी जखडून ठेवण्यात आले असून त्याच्या शरीरावर जागोजागी लोखंडी अंकुशाने केलेल्या जखमा आहेत. माहुताने टोकदार अंकुश सुंदरच्या डोळ्यात घातल्याने त्याचा उजवा डोळा गंभीर जखमी झालेला आहे. परिणामी, उजव्या डोळ्याची दृष्टी अंधूक झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तो एक पाऊलदेखील पुढे चालू शकत नाही. त्याला रोजच मारहाण केली जात आहे. ही तक्रार पेटाला प्राप्त झाल्यानंतर सुंदरला मंदिराच्या ताब्यातून जंगलात मुक्त करण्यासाठी ‘पेटा’च्या स्वयंसेवकांनी वनमंत्री पतंगराव कदम यांना साकडे घातले होते. छळाची धक्कादायक माहिती मिळाल्यानंतर याची गंभीर दखल घेऊन पतंगरावांनी सुंदरची त्वरित सुटका करण्याचे आदेश जारी केले आहेत. परंतु, वनमंत्र्यांच्या आदेशानंतरही सुंदरचा छळ थांबलेला नाही वा त्याची सुटकाही झालेली नाही. या संदर्भात प्रधान मुख्य वनसंरक्षक ए.के. जोशी यांच्याशी संपर्क साधला असता हत्तीच्या सुटकेची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगून अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला.
गुरुवारी सुंदरच्या सुटकेसाठी केल्या जाणाऱ्या धरणे आंदोलनासाठी हत्तीच्या वेशभूषेतील प्राणीप्रेमी स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी हाती फलक घेऊन नागपुरातील वनभवनापुढे जमावे, असे आवाहन पेटाने केले आहे. या आंदोलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी  This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it . . या संकेतस्थळावर मोबाईल क्रमांकासह संपर्क साधावा आणि आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने प्राणीप्रेमींनी सहभागी होऊन सुंदरला त्याचे स्वातंत्र्य मिळवून द्यावे, असे आंदोलन समन्वयक चानी सिंह यांनी म्हटले आहे.     
देवस्थानचे हत्ती रामभरोसे!
बंगलोरस्थित प्राणी कल्याण संघटना ‘कुपा’ ने अलीकडेच प्रकाशित केलेल्या एका अभ्यास अहवालानुसार भारतीय मंदिरात पाळण्यात आलेले ९० टक्के हत्ती बंदिस्त कोठडीत आणि सिमेंट, दगडी किंवा फरशीच्या जागांवर बांधलेले असतात. त्यामुळे त्यांच्या पायांना जखमा झालेल्या असतात. हत्तींसाठी बांधलेले शेड ऊनवाऱ्यापासून संरक्षण देणारे नसते. पाण्याचे चांगले स्रोत उपलब्ध असतानाही ८० टक्के हत्तींना अत्यंत अशुद्ध पाणी पाजले जाते. जवळजवळ ७२ टक्के हत्तींना हलक्या दर्जाचे खाणे दिले जाते. त्यांचे खाणेपिणे माहूतच ठरवतो. हत्तींना हाताळणारे माहूत प्रशिक्षित नसल्याने हत्तींच्या वागणुकीतही प्रचंड बदल झालेला दिसतो. हत्तींचे बिथरणे केव्हाही घातक ठरू शकते. हत्ती हा अत्यंत संवदेनशील प्राणी असून सामाजिक जगात राहणारा आहे. परंतु, एकांतवासाने त्याची मानसिक स्थिती बदलते. मंदिरातील हत्तींना १२ ते २२ तास साखळदंडांनी जखडून ठेवले जाते. एकांतवासात ठेवले जात असल्याने हत्तींची मानसिकता हिंसक होऊ शकते. ज्या माहुतांकडे हत्तींच्या पालनपोषणाची जबाबदारी दिली जाते, त्या माहुतांचा सामाजिक आणि आर्थिक दर्जा अत्यंत खालचा आहे. त्यामुळे ते हत्तींची देखभाल चांगल्या तऱ्हेने करू शकत नाहीत.