निम्को कंपनीच्या व्यवस्थापकाला मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल Print

खोपोली, १७ ऑक्टोबर
खालापूर तालुक्यातील होराळे ग्रामपंचायत हद्दीतील निम्को कंपनीचे व्यवस्थापक, फिर्यादी महेश चंद्रिका पांडे (४८, रा. निम्को कंपनी कॉलनी, होराळे, पो. वावोशी, ता. खालापूर) यांना लाथाबुक्क्य़ाने मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याबद्दल होराळे गावातील ग्रामस्थ समीर पाटील, व्हिकी, जितू विचारे, अमोल मोरे यांच्या विरोधात खालापूर पोलीस स्टेशनमध्ये भा.द.वि. कलम ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
निम्को कंपनीमध्ये कन्स्ट्रक्शनचे काम सुरू आहे, तद्नुषंगाने मंगळवारी (१६ ऑक्टोबर) एमएच-०६- एक्यू-४७२२ क्रमांकाची सीमेंट मिक्सरची गाडी कंपनीमध्ये जात होती. आरोपी समीर पाटील, अमोल मोरे, व्हिकू, जितू विचारे यांनी सीमेंट मिक्सरची गाडी होराळे गावच्या हद्दीत अडवून ठेवली होती. गाडी का अडवून ठेवण्यात आली आहे, अशी विचारणा करण्यास व्यवस्थापक महेश पांडे घटनास्थळी गेले होते. यापूर्वी कंपनीला सप्लाय केलेल्या वाळूच्या बिलाची रक्कम अद्याप आपणास मिळालेली नाही. प्रलंबित बिलाची रक्कम दिल्यानंतरच सीमेंट मिक्सरची गाडी सोडण्यात येईल, अशी भूमिका आरोपींनी घेतली. बिलासंदर्भात घटनास्थळी बोलण्यास असमर्थता व्यक्त करणाऱ्या महेश पांडे यांना संतप्त आरोपींनी लाथाबुक्क्य़ाने मारहाण केली. जिवे ठार मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार झाले. सदर प्रकरणी पोलीस निरीक्षक इरगुंडा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक सातव फरार आरोपींचा वेगाने तपास करीत आहेत.