मजगावचा ‘समर्थ’ मूर्तिकार Print

मुरुड, १७ ऑक्टोबर
मातीला ज्यांच्या हाताचा स्पर्श होतो त्या मातीचे सोने एका जिवंत मूर्तीत पाहावयास मिळते. अगदी तरुण वयातच त्यांचे हात मातीला स्पर्श करू लागले व प्रदीर्घ कष्टानंतर एक चांगला मूर्तिकार घडून आला. मजगाव येथील चंद्रकांत बुल्लू हे मूळचे मच्छीमार व्यवसायातले, पण वडिलांकडून प्रेरणा घेऊन गेली ५१ वर्षे प्रदीर्घ कारखानदारीत घालवत त्यांनी मनापासून मूर्ती घडविण्यात आपले आयुष्य वेचले आहे. गणेशाची मूर्ती तद्नंतर देवींच्या मूर्ती बनवण्यात ते सतत कार्यरत असतात. सुबक मूर्ती, उत्कृष्ट रंगकाम व डोळ्यांची आखणी अगदी ते हुबेहूब साकारून मूर्तीला आपल्या कलेतून जिवंत बनवितात. मूर्तीचे काम ते अगदी हळुवार व मन लावून करतात. कोणतीही घाई न करता वेळ कितीही वाया गेला तरी चालेल; परंतु मूर्ती नेणाऱ्याला खरे समाधान मिळावयास हवे. मूर्तीच्या किमतीपेक्षा मूर्तीमधील जिवंतपणा दिसला तर ग्राहक संख्या निश्चितच वाढते. मजगाव येथील कलामंदिर कारखान्यात वर्षभर विविध प्रकारच्या मूर्ती ते तयार करीत असतात. त्यांच्या या कारखान्यात सहा मदतनीस असतात; परंतु प्रत्येक मूर्ती बारकाईने न्याहाळूनच ग्राहकांना देत असतात. आज त्यांच्या मूर्तीना रायगड जिल्ह्य़ात विविध ठिकाणी मागणी आहे. ग्रामीण भागात शाडूच्या मातीच्या मूर्तीना खूप मागणी असते; परंतु ग्रामीण भागाचा विचार करून ते मूर्ती कमी किमतीत देत असतात. चंद्रकांत बुल्लू यांनी दिलेल्या बहुमूल्य योगदानाबद्दल त्यांचे विविध सामाजिक संघटनांकडून सत्कार झाले आहेत. जीवनासाठी कला व कलेसाठी जीवन हे सूत्र गेले कित्येक वर्षे ते प्रामाणिकपणे बजावत आहेत. त्यांना आपल्या कलेचा अहंकार नाही; परंतु माणुसकी व प्रेम असल्याने मजगाव ग्रामपंचायतमध्ये त्यांना मानाचे स्थान आहे.