स्मिता खेडेकर यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या सचिवपदी नियुक्ती Print

मुरुड, १७ ऑक्टोबर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रायगड जिल्हा उपाध्यक्षा स्मिता रवींद्रनाथ खेडेकर यांची नुकतीच महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आल्याने मुरुड तालुक्यात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. रोहा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या झालेल्या कार्यक्रमामध्ये राज्याचे जलसंपदामंत्री तथा रायगड जिल्ह्य़ाचे पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत स्मिता खेडेकर यांना महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष मधुकर पिचड यांच्या सहीचे नियुक्तीपत्र देण्यात आले. शैक्षणिक क्षेत्रामध्ये रायगड जिल्हा आदर्श शिक्षिका पुरस्कार तसेच राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले राज्य पुरस्कारप्राप्त स्मिता खेडेकर यांनी शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक सेवेचा वसा घेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात आठ वर्षे संचालक म्हणून काम केले आहे. मुरुड तालुका पंचायत समितीचे सभापतीपद चार वर्षे सांभाळले होते. स्मिता खेडेकर यांनी आपल्या नियुक्तीबाबत समाधान व्यक्त केले आहे. सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक विधानसभा आमदार सुरेश लाड, आमदार अनिल तटकरे यांच्यासोबत काम करण्याचा मानस व्यक्त केला. आपल्यावर टाकलेली जबाबदारी निश्चितपणे पार पाडून व पक्ष बळकटीसाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे या वेळी खेडेकर यांनी सांगितले. गेली अनेक वर्षे त्यांनी रायगड जिल्हा उपाध्यक्षा म्हणून जिल्ह्य़ात प्रभावी काम केले होते. त्याचीच दखल घेत त्यांना हे पद देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.