जिल्हा अग्रणी बँकेच्या अजब कारभारामुळे भरुदड सोसावा लागणाऱ्या व्यापारी वर्गात असंतोष Print

खोपोली, १७ ऑक्टोबर
रायगड जिल्हा अग्रणी बँकेच्या अजब नियमामुळे व्यापारी बांधवांना आर्थिक भरुदड सोसावा लागत असून, मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे, अशी माहिती फटाके विक्रीचा व्यवसाय करणारे व्यापारी महेश दबके यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयांकडून विक्री परवाना प्राप्त होतो. तालुका तहसील कार्यालयांकडून दरवर्षी त्यांचे नूतनीकरण करावे लागते. नूतनीकरणांची फी जिल्हा अग्रणी बँक म्हणून घोषित करण्यात आलेल्या बँक ऑफ इंडियाच्या खालापूर येथील तालुका शाखेच्या ट्रेझरी विभागामध्ये चलनाद्वारे भरावी लागते. बँक ऑफ इंडियाची शाखा खोपोलीमध्ये आहे, त्यामुळे चलनाद्वारे भरणा करण्यात येणाऱ्या नूतनीकरण फीचा खोपोली शाखेने स्वीकार करणे क्रमप्राप्त ठरते, पण खोपोली शाखा चलन भरणा स्वीकारत नाही. खालापूर शाखेत भरणा करावा असे सांगण्यात येते. त्यामुळे खोपोलीतील व्यापारी बांधवांना खोपोलीपासून आठ किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या खालापूर शाखेत वाहतुकीचा भरुदड सोसून जावे लागते. वेळेचा अपव्यय होतो. खालापूर गावाला तालुक्याचा दर्जा दिला आहे. खोपोलीचा समावेश खालापूर तालुक्यात होतो. तालुक्याचा दर्जा दिलेल्या खालापूरची लोकसंख्या सहासात हजारांच्या घरात आहे, पण तालुक्यातील खोपोली गावाची लोकसंख्या सुमारे ८५ हजार असल्यामुळे खोपोलीली नगरपालिकेचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे खोपोलीला शॉप अ‍ॅक्ट लागू आहे, पण खालापूरला शॉप अ‍ॅक्ट लागू नाही. शॉप अ‍ॅक्ट लागू असलेल्या खोपोलीतील व्यापाऱ्यांना, खोपोलीत अस्तित्वात असलेल्या जिल्हा अग्रणी म्हणून घोषित करण्यात आलेल्या बँक ऑफ इंडियाच्या शाखेत शॉप अ‍ॅक्टअंतर्गत फीचा भरणा करता येत नाही, पण जेथे शॉप अ‍ॅक्ट लागू नाही अशा आठ किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या खालापूरच्या शाखेत जाऊन फीचा भरणा करावा लागतो, असा हा अजब कारभार आहे. शासनाला महसुली उत्पन्न व बँकेला व्यवसाय उपलब्ध करून देणाऱ्या व्यापारी बांधवांची सोय बघण्याऐवजी शासकीय यंत्रणा व बँकेचे व्यवस्थापन संगनमताने खोपोलीतील व्यापारी बांधवांची गैरसोय व आर्थिक नुकसान करण्यातच धन्यता मानत असल्याचे निदर्शनास येते, अशी खंत महेश दबके यांनी पुढे बोलताना व्यक्त केली. पूर्वी नूतनीकरणाची जेवढी फी होती, तेवढय़ा रकमेचे चलन बँक ऑफ इंडिया स्वीकारत होती. फटाके विक्री करणाऱ्या व्यापारी बांधवांना ३१ मार्च २०१२ पूर्वी नूतनीकरण करून घ्यावे लागले. नूतनीकरणाची फी शासनाने १५० रुपये केली आहे. बँक ऑफ इंडियाच्या खालापूर शाखेतील ट्रेझरी विभागाने कमीत कमी ३० रुपये चलनाद्वारे भरावे लागतील असा फतवा घोषित केला आहे, त्यामुळे नूतनीकरणाची शासकीय फी १५० रु. असताना व्यापारी बांधवांना ३०० रुपये चलनाद्वारे भरावे लागतात. त्यामुळे भरुदड व मनस्ताप सहन करत खोपोलीतून खालापूरला जावे लागणाऱ्या व्यापाऱ्यांच्या भरुदडात अतिरिक्त भरणा कराव्या लागणाऱ्या १५० रुपयांची भर पडते असा खुलासा महेश दबके यांनी केला. शासनाचे व बँकेचे धोरण व्यापारी बांधवांना तत्पर सेवा व सुविधा उपलब्ध करून देण्याऐवजी व्यापारी बांधवांची छळवणूक करण्याचे दिसत आहे. त्यामुळे खोपोलीतील तमाम व्यापारीवर्ग हैराण झाला असून, तीव्र आंदोलन छेडण्याचा गर्भित इशारा महेश दबके यांनी दिला.