शेतकऱ्यांच्या मूल्यांकनासाठी गटशेती आवश्यक-कुलगुरू डॉ. के. ई. लवांडे Print

कर्जत, १७ ऑक्टोबर
नैसर्गिक व्यवधाने, वीज-पाणी व्यवस्थापन, कौटुंबिक जबाबदाऱ्या, उत्पादक, विक्रेता अशा विविध पातळ्यांवरील समस्या एकाच वेळी कौशल्याने हाताळणारा शेतकरी हा फार मोठा व्यवस्थापक आहे, पण त्याचे मूल्यांकन मात्र कोठेच होत नाही. त्यासाठी गटशेती आवश्यक असून, त्या माध्यमातून विविध व्यवस्थापन विभागल्यास त्याचे मूल्यांकन होऊ शकेल आणि शेतमालाचे मूल्यवर्धन झाल्यास शेती अधिक फायदेशीर होईल, असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. ई. लवांडे यांनी केले.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र आणि महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कै. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षांनिमित्त भात बीजोत्पादक, वितरक आणि शेतकरी चर्चासत्राचे आयोजन किरवली येथील शेळके बंधू सभागृहामध्ये करण्यात आले होते. त्या वेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक डी. आर. बन्सोड, राजनाला भात बीज उत्पादक व रोपवाटिका सहकारी संस्थेचे अध्यक्ष बाळ दळवी, दुर्गामाता बीज उत्पादक संघाचे अध्यक्ष वि. रा. देशमुख, महाबीजचे महाव्यवस्थापक (उत्पादन) एस. एम. पुंडकर, सहयोगी संशोधन संचालक डॉ. बी. एल. ठवरे, उपविभागीय कृषी अधिकारी एस. जी. थोपटे, महाबीजचे विभागीय व्यवस्थापक ए. एल. सोसोने उपस्थित होते.
डॉ. लवांडे पुढे म्हणाले यांत्रिकीकरण, गटशेती, कृषीपूरक व्यवसाय, नवतंत्रज्ञान व आत्मिक बळ ही कृषी विकासाची पंचसूत्री आहे. भातशेतीमध्ये उत्पादन खर्च आणि विक्री यांच्यात ताळमेळ बसत नसल्याने शेतकऱ्यांनी भातानंतर पुन्हा भात घेण्याऐवजी कडधान्य अथवा भाजीपाला घेतला तर ते फायद्याचे ठरेल. शेती हे उपजीविकेचे साधन असल्याने प्रलोभनाला बळी पडून गरज नसताना शेतकऱ्यांनी शेती विकू नये, असा सल्ला डॉ. लवांडे यांनी दिला. बन्सोड यांनी आपल्या प्रमुख मार्गदर्शनात शेतकऱ्यांना उचित दर मिळवून देण्यासाठी महाबीज कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहयोगी संशोधन संचालक डॉ. बी. एल. ठवरे यांनी केले. डॉ. आर. एल. कुणकेरकर यांनी दृकश्राव्य माध्यमातून ‘भात जाती आणि बीजोत्पादन तंत्रज्ञान’ या विषयाचे सादरीकरण केले. एस. एम. पुंडकर यांनी ‘बीजोत्पादन कार्यक्रमातील गुणवत्ता वाढ’ या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी बाळ दळवी, वि. रा. देशमुख, शेतीनिष्ठ शेतकरी कृष्णाजी कदम, बियाणे कंपनीचे प्रतिनिधी प्रा. विजय देशपांडे यांची समयोचित भाषणे झाली. याच मेळाव्यामध्ये केंद्र व राज्य पुरस्कृत कृषी योजनेच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन डॉ. लवांडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. रवींद्र मर्दाने यांनी केले, तर आभारप्रदर्शन ए. एल. सोनोने यांनी केले. या वेळी शास्त्रज्ञ, अधिकारी आणि शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.