‘होर्डिगसंबंधी पालिका आयुक्तांनी ठेवलेले विषयपत्र बेकायदेशीरच’ Print

प्रतिनिधी
पुणे
महापालिका पक्षनेत्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार होर्डिगच्या दराबाबत जे विषयपत्र आयुक्तांनी ठेवले, ते बेकायदेशीर असून महापालिकेचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान करणाऱ्या या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्यास त्याला सर्व मार्गानी विरोध केला जाईल, असा इशारा काँग्रेसचे आबा बागूल यांनी दिला आहे.
महापालिकेच्या मुख्य सभेने जे जाहिरात धोरण दोन वर्षांपूर्वी एकमताने मंजूर केले आहे. त्याची अंमलबजावणी झाल्यास शहराचे विद्रूपीकरण थांबणार आहे आणि महापालिकेच्या उत्पन्नात दरवर्षी शंभर कोटी रुपयांची भर पडणार आहे. या वस्तुस्थितीचा कोणताही विचार न करता या धोरणाशी विसंगत असा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडण्याचा तोंडी आदेश पक्षनेत्यांनी आयुक्तांना दिला आणि आयुक्तांनीही तसा प्रस्ताव ठेवला. मुळातच जे धोरण राज्य शासनापुढे अंतिम निर्णयासाठी प्रलंबित आहे, त्याच धोरणाची अंमलबजावणी प्रशासनाने करणे आवश्यक आहे, असे बागूल यांचे म्हणणे आहे.