शिवाजी रोडवर पुन्हा फेरीवाले.. Print

नाशिक
प्रतिनिधी
काही दिवसांपूर्वी येथील शिवाजी रोडवर व्यवसाय करण्यास महापालिकेने प्रतिबंध केलेल्या फेरीवाल्यांनी राष्ट्रीय फेरीवाला संघटनेच्या माध्यमातून बुधवारी शिवाजी रोडवर प्रतीकात्मक आंदोलन करीत आपले व्यवसाय पुन्हा सुरू केले. या वेळी पालिका प्रशासनाने मात्र त्यांच्यावर कारवाई करण्याचे टाळले. शिवाजी रोडवरील बाजारपेठेत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक सानप यांच्या प्रमुख उपस्थितीत फेरीवाला व्यावसायिकांनी आंदोलन केले. सणोत्सवात फेरीवाल्यांना विक्रीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, या मागणीसाठी संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती. बुधवारी संघटनेच्या वतीने घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले. या वेळी पालिका प्रशासनाने आंदोलनकर्त्यांवर कारवाई करण्याचे टाळले. त्यामुळे दुपारी शिवाजी रोडवर पुन्हा व्यावसायिकांनी आपला व्यवसाय सुरू केले.
या वेळी शहर सरचिटणीस सचिन कोकाटे, फारुक शेख, सुनील खैरनार, राजाभाऊ शेलार, दीपक प्रभाणी, लक्ष्मण कमरे, मिलिंद पवार आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.