सिंधुदुर्गमध्ये दूरध्वनी ग्राहकांमध्ये घट, तर मोबाइलधारकांमध्ये वाढ Print

सावंतवाडी
 वार्ताहर
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात दूरध्वनीचे ग्राहक घटत असून, मोबाइल ग्राहकांत वाढ होत असल्याचे दूरसंचार जिल्हा प्रबंधक प्रभाकर पाटील यांनी सांगितले. मोबाइल दुरुस्ती विभाग आमच्याकडे वर्ग करण्यात आल्याने तक्रारी दूर करणे शक्य होईल, असे सांगतानाच अडीच लाख मोबाइल ग्राहक आहेत असे ते म्हणाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात दूरध्वनी झपाटय़ाने बंद होत आहेत. आता ही कनेक्शन्स ३६ हजार आहेत, पण दर महिना ३० कनेक्शन्स बंद होत आहेत, असे प्रभाकर पाटील म्हणाले. मोबाइल अ‍ॅव्हरेजबाबत दक्षता घेतली जाईल. नव्याने एफडब्लूपी हा फोन आला आहे, असे त्यांनी सांगितले.
मोबाइल दुरुस्ती विभाग आता जिल्हा दूरसंचार विभागाकडे वर्ग होत असल्याने तक्रारी दूर करणे शक्य आहे, असे ते म्हणाले. जिल्ह्य़ात १६४ मोबाइल टॉवर्स आहेत, त्यातील सहा बंद आहेत. शिवाय डीओटी विभागाचे १७ टॉवर्स खाजगी ऑपरेटर्स सेवा देत नाहीत म्हणून चार वर्षे बंद आहेत, असे पाटील म्हणाले.
डिपार्टमेंट ऑफ टेलिफोन विभागाने १७ टॉवर्स खाजगी ऑपरेटर्सना विकसित करून दिले आहेत. पण त्यांची सेवा बंदच आहे. त्यांना दंड आकारला जातो, असे सांगताना या १७ टॉवर्सबाबत डीओटीने कार्यवाही करण्याची गरज आहे, असे जिल्हा प्रबंधक प्रभाकर पाटील यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात अडीच लाख मोबाइल ग्राहक आहेत. या ग्राहकांची संख्या वाढत आहे. सध्या मोबाइल कव्हरेज व फोन करताच कट होण्याच्या प्रकारांबाबत तांत्रिक दुरुस्त्या करण्यात येतील, असे प्रभाकर पाटील म्हणाले.
दूरसंचार विभागाने मोबाइलसारखा एफडब्लूपी हा फोन विकसित केला आहे, तो ग्राहक स्वीकारतील, असे ते म्हणाले.