शास्त्रज्ञांसमवेत विद्यार्थी गिरवणार संशोधनाचे धडे Print

खास प्रतिनिधी
रत्नागिरी
उच्च शिक्षणाच्या प्रारंभीच विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत संशोधनाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात खास कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून कोकणातील विद्यार्थ्यांना नामवंत शास्त्रज्ञांच्या सहवासात संशोधनाचे धडे गिरवण्याची सुवर्णसंधी लाभणार आहे.
    केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या सहकार्याने ‘इन्स्पायर’ प्रकल्पांतर्गत येत्या २५ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या या कार्यशाळेबाबत रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. विलास पाटणे आणि महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी माहिती देताना सांगितले की, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्'ाांमधील ११ वीच्या विज्ञान शाखेत शिकणाऱ्या सुमारे दीडशे विद्यार्थी-विद्यार्थिनींना या कार्यशाळेचा लाभ होणार आहे. त्यासाठी १०वीच्या परीक्षेत किमान ९३.२० टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. या गुणवान विद्यार्थ्यांना डॉ. अरविंद नातू (आयशर, पुणे), डॉ. आर.टी.साने, डॉ. सुरेंद्र कुलकर्णी (टाटा मूलभूत विज्ञान संशोधन संस्था), डॉ. आनंद घैसास (डॉ. होमी भाभा विज्ञान संस्था), डॉ. बबन इंगवले (राष्ट्रीय सागरी विज्ञान संस्था), भटनागर पुरस्कार विजेते डॉ. प्रमोद हनमगोंड आणि डॉ. संजयन  (राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा) इत्यादी नामवंत शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन आणि अनौपचारिक सहवास लाभणार आहे. या कार्यशाळेचे हे सलग दुसरे वर्ष आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी उपयुक्त पुस्तके, वैज्ञानिक साहित्य, भोजन-निवास मोफत दिले जाणार असून प्रात्यक्षिके आणि भेटींचाही कार्यक्रम होणार आहे.
    अशा प्रकारे विद्यार्थ्यांना मूलभूत वैज्ञानिक संशोधनासाठी प्रवृत्त करतानाच सध्याच्या स्पध्रेच्या युगात त्यांच्या पालकांचीही मानसिकता बदलणे गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन गेल्या वर्षी झालेल्या पहिल्या कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी खास सत्र आयोजित करण्यात आले होते. केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने या उपक्रमाची गौरवपूर्ण नोंद घेतल्याचे सांगून डॉ. सुखटणकर म्हणाले की, यंदाही अशा प्रकारे पालकांसाठी स्वतंत्र सत्र होणार आहे. अलीकडील काळात जास्त चांगल्या पगाराच्या अपेक्षेमुळे विद्यार्थी माहिती तंत्रज्ञान क्षेत्राकडे जास्त आकर्षित होतात. पण मूलभूत संशोधनामध्येही उत्तम करिअर होऊ शकते आणि औद्योगिक क्षेत्राच्या या बाबतच्या गरजेमुळे चांगले ‘पॅकेज’ही मिळू शकते, हे ठसवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी या योजनेचा लाभ घेतलेले किती विद्यार्थी बारावीनंतर मूलभूत संशोधनाकडे वळतात, याचा मागोवा घेतला जाणार आहे. त्या दृष्टीने गेल्या वर्षीच्या कार्यशाळेनंतर विद्यार्थी आणि पालकांकडून आलेल्या प्रतिक्रिया उत्साहवर्धक आहेत.