ऊसदराबाबत हिंसक आंदोलनापेक्षा चर्चेने मार्ग काढू-मुख्यमंत्री Print

प्रतिनिधी
पिंपरी
सहकार चळवळ व साखर उद्योग मोठय़ा अडचणीतून जात असून सावध पावले टाकण्याची गरज आहे. अशा वेळी शेतकऱ्यांनी ऊसदराच्या विषयावरून आंदोलने छेडण्यापेक्षा शासनाशी चर्चा करून निर्णय घेण्याची सकारात्मक भूमिका ठेवावी, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कासारसाईत केले. सवंग लोकप्रियतेसाठी मोर्चे व तोडफोड करणारी आंदोलने होत असून, शेतकऱ्यांसमोर गोंडस चित्र निर्माण केले जाईल, भडकवणारी भाषणे होतील, त्याला प्रतिसाद देऊ नका, असेही ते म्हणाले.
राज्यातील पहिल्या गळीत हंगाम सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री कासारसाईत आले होते. त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ऊसदराबाबत चर्चा व तडजोडीतून प्रश्न सुटू शकतात. चुकीचे काही होत असल्यास त्याविरोधात कारवाई करू. त्यादृष्टीने संवाद साधू, आंदोलनापेक्षा चर्चा करून निर्णय घेऊ. वेळप्रसंगी केंद्राकडे पाठपुरावा करू.
सहकार तसेच साखर उद्योग संकटात आहे. सहकारासमोर नैसर्गिक आपत्तीप्रमाणेच खासगीकरणाचे कडवे आव्हान आहे. यंदा साखर उत्पादन ४० टक्क्याने घटणार आहे. १२० दिवसांपेक्षा जास्त दिवस गळीत हंगाम चालणार नाही. कारखाने चालू ठेवण्यापेक्षा बंद ठेवणे परवडणार आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
‘पाण्याचे न्याय्य वाटप आवश्यक’
हवामानात सातत्याने फरक पडतो आहे. दुष्काळ व भरपूर पाऊस असे परस्परविरोधी चित्र राज्याच्या वेगवेगळय़ा भागांत दिसून येते. पीकपाण्याबरोबरच पाण्याचे संकट भीषण आहे. पाण्यावरून होणारे तंटे राज्यभरात दिसून येतात. मावळातील शेतकऱ्यांची लढाई सर्वश्रुत आहे. पाण्याचे न्याय्य पद्धतीने वाटप होणे गरजेचे आहे.
मात्र, तितके पाणीच उपलब्ध नाही, ही वस्तुस्थिती आहे. यापुढे पाण्याचा जपून व शास्त्रीय पद्धतीने वापर करावा लागणार आहे, अशी भूमिका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली.