साई संस्थानला जडला मोह जडजवाहिरांचा Print

वार्ताहर

राहाता
आयुष्यभर भिक्षा मागून उदरनिर्वाह केल्यानंतरही साईबाबांनी समानतेचीच शिकवण दिली. त्यांच्या दरबारात साई संस्थानने मात्र देणगीतही भेदाभेद सुरू केली आहे. गेल्या महिनाभरापासून साई मंदिरात धान्य, तेल, तूप आदी स्वरूपात येणाऱ्या देणग्या स्वीकारणे बंद करून केवळ सोने, चांदी, जडजवाहीर व पैशाच्या स्वरूपातच देणगी स्वीकारण्यात येत आहेत. त्यामुळे धान्य घेऊन येणाऱ्या सामान्य भाविकांच्या पदरी निराशा येत आहे.
साईबाबा संस्थानच्या त्रिसदस्यीय समितीने नुकतीच खाद्यपदार्थविषयक सल्लागाराची नियुक्ती केली असून त्यांच्या आदेशाने सद्य देणगी स्वरूपात आलेले धान्य, दाळी, तेल, तूप व नामांकित कंपन्यांच्या पॅकिंग वस्तूही संस्थानकडून नाकारण्यात येत आहेत. देणगी स्वरूपात संस्थानकडे जे धान्य जमा होते ते प्रसादालयात वापरण्यात येत आहे, मात्र सद्य संस्थान हे सर्व धान्य बाजारातून खरेदी करीत आहेत. चार महिन्यांपूर्वी संस्थानच्या प्रसादालयाची धान्य खरेदी रखडली होती त्या वेळी भक्तांनी थेट वस्तू पुरवून जवळपास महिनाभर प्रसादालय चालवले. दक्षिणेतील एक भाविक दर वर्षी १ टन शेवया देत असतो, तर अनेक जण धान्याची पोती देत असतात. मात्र संस्थानच्या नवीन निर्णयामुळे या स्वरूपातील दान बंद होणार आहे.
येत्या विजयादशमीला साईबाबांचा पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येणार असून या दिवशी संस्थानच्या वतीने शिर्डी गावातून भिक्षा झोळी फिरवण्यात येते. यात भाविक धान्य अर्पण करत असतात. संस्थानकडून महिनाभरापासून धान्याची देणगी स्वीकारणे बंद करण्यात आल्याने या कार्यक्रमाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. साईबाबांनी आयुष्यभर भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह केला.
साईबाबा संस्थान सध्या करोडपती झाले तरी साईबाबांची भिक्षा मागण्याची परंपरा व अहंकार नष्ट करणारी शिकवण भिक्षा मागवून जतन करण्यात आली आहे. संस्थानच्या पदाधिकाऱ्यांसह सोडत पद्धतीने भाविकांना या भिक्षा झोळीच्या कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात येते. गळ्यात झोळी अडकवून गावात भिक्षा मागण्यात येते. त्यांच्या झोळीत धान्य, पैसे टाकण्यात येतात. या भिक्षारूपी आलेल्या धान्यातून गव्हाचे एक पोते द्वारकामाई मंदिरात बाबांच्या प्रतिमेजवळ ठेवण्यात येते. दरवर्षी भिक्षा झोळीच्या माध्यमातून शेकडो पोते धान्य व हजारो रुपये जमा होतात. नंतर या धान्याची देणगी पावती करून ते संस्थानच्या भांडारात जमा करण्यात येते. संस्थानने धान्याची देणगी स्वीकारणे बंद केल्याने विजयादशमीच्या दिवशी शिर्डी गावातून साईबाबांची भिक्षा झोळी फिरणार का? याबाबत भक्तांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
भेसळीच्या तूप प्रकरणानंतर अन्न व भेसळ विभागाच्या मानांकनानुसार धान्य, तेल, तूप या स्वरूपात येणारी देणगी स्वीकारणे थांबविण्यात आले आहे. मात्र, धार्मिक भावना व नियम यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करावा लागेल. यासाठी संस्थानच्या त्रिसदस्यीय समितीपुढे विषय मांडण्यात येऊन यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे साईबाबा संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी सांगितले.