माजी आमदार ओंकार वाघ यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार Print

वार्ताहर, जळगाव
जिल्ह्यातील पाचोऱ्याचे माजी आमदार व ज्येष्ठ समाजवादी नेते ओंकार वाघ (८०) यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी राणीचे बांबरूड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. दिलीप वाघ यांचे ते वडील होत. वाघ यांच्यावर नाशिक येथे महिन्यापासून उपचार सुरू होते. शरीराकडून उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांना त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले. तेथेच बुधवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. समाजवादी विचारसरणीचे व लढाऊ, झुंजार नेते म्हणून त्यांना ओळखले जात असे. १९५७ मध्ये ते सर्वप्रथम पाचोरा विधानसभेतून संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार म्हणून विजयी झाले. परंतु ही निवड अवैध ठरल्यानंतर १९५८ मध्ये पोटनिवडणूक होऊन पुन्हा तेच विजयी झाले. अंत्यसंस्कारास सर्व स्तरांतील नागरिक उपस्थित होते.