नाशकात प्रथमच ‘इंडो-यूएस एमर्जन्सी मेडिसीन’ परिषद Print

प्रतिनिधी, नाशिक
येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि असोसिएशन ऑफ फिजीशियन्स ऑफ नाशिक यांच्या तर्फे २६ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत आठव्या ‘इंडो-यूएस एमर्जन्सी मेडिसीन’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, या परिषदेचे उद्घाटन राज्यपाल के. शंकरनारायण यांच्या हस्ते होणार असून, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित, अपारंपरिक ऊर्जा राज्यमंत्री डी. पी. सावंत, महापौर अ‍ॅड. यतीन वाघ उपस्थित राहणार आहेत.
याबाबतची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. नाशकात प्रथमच आंतरराष्ट्रीय परिषद होत असून त्यात ५०-६० पाश्चात्त्य वक्ते सहभागी होणार असल्याचे डॉ. नारायण देवगांवकर यांनी सांगितले. परिषदेच्या उद्घाटन सत्रानंतर २६ रोजी डॉ. विलास गुजराथी आणि डॉ. सागर व्यवहारे यांचे ‘ईसीजी कोर्स’, डॉ. सागर गळवणकर यांचे ‘करिअर फोरम’, डॉ. रवींद्र जोशी यांचे ‘इमर्जन्सी अ‍ॅण्ड ट्रोमा एअर वे’, डॉ. भरत केळकर यांचे ‘वाऊन्ड केअर अ‍ॅण्ड स्प्लाइटिंग स्किल्स’ आदींची व्याख्याने होणार आहेत. या परिषदेसाठी भारत-अमेरिका सल्लागार परिषदेचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. आतापर्यंत एक हजार जणांनी नोंदणी केली असून काही दिवसांत हा आकडा १५०० पर्यंत पोहचेल, असा अंदाज त्यांनी वर्तविला.
दरम्यान, परिषदेच्या आधी ‘आपत्ती व्यवस्थापन’ या विषयावर कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेत ‘अमेरिका व इस्रायल मॉडय़ुल’बाबत माहिती दिली जाईल. एखादी आपत्ती अथवा घटना घडल्यानंतर काळजी घेण्यापेक्षा घटना घडू नये यासाठी नागरिकांना तयार करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यात नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण, वैद्यकीय सुविधा आदींबाबत माहिती देण्यात येणार आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर, गर्दीच्या व्यवस्थापनासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात येणार आहे.