मुंबई-दिल्ली कॉरिडोरविरोधात माणगावात शेतकऱ्यांचा मोर्चा Print

प्रतिनिधी, अलिबाग
 शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा मुंबई-दिल्ली कॉरिडोर प्रकल्प एसईझेड प्रमाणे हुसकावून लावू, असा इशारा जागतिकीकरण विरोधी समितीच्या नेत्या उल्का महाजन यांनी दिला. मुंबई-दिल्ली कॉरिडोरविरोधात शेतकऱ्यांनी आज माणगावच्या प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता, त्या वेळी त्या बोलत होत्या.
देशात शेतीचे उत्पादन घटत आहे, तरीही सरकार पिकत्या जमिनीवर प्रकल्प आणण्याचा प्रयत्न करते आहे. मात्र रायगड जिल्ह्य़ातील महामुंबई सेझ प्रकल्प शेतकऱ्यांनी नेटाने लढा देऊन हुसकावून लावला, त्याचप्रमाणे हा मुंबई कॉरिडोर हुसकवून लावू, असा निर्धार या वेळी करण्यात आला. या मोर्चाला ज्येष्ठ शेकापनेते एन. डी. पाटील आणि महाडचे शिवसेना आमदार भरत घोगावले यांच्यासह माणगाव, तळा आणि रोहा तालुक्यांतील शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कोकणात प्रकल्प आणायचे असतील तर नारायण राणे आणि तटकरे यांनी त्यांच्या जमिनी द्याव्यात, शेतकऱ्यांच्या पिकत्या जमिनी प्रकल्पासाठी घेऊ नये, असा इशारा उल्का महाजन यांनी दिला. विदर्भात शेतकरी आत्महत्या करतात त्या ठिकाणी  प्रकल्प का येत नाहीत, असा सवालही त्यांनी केला. आजचा मोर्चा हा शेतकऱ्यांच्या लढाईची खरी सुरुवात आहे. येणाऱ्या काळात नेटाने प्रकल्पाविरोधात लढा द्यावा लागेल, असे शेकापनेते एन. डी. पाटील यांनी सांगितले, तर शेतकऱ्यांच्या या लढय़ात शिवसेनाही साथ देईल, असे आश्वासन आमदार भरत घोगावले यांनी दिले.