मालेगावी स्वच्छता कर्मचाऱ्यांची ‘घाऊक’ गैरहजेरी उघड Print

वार्ताहर, मालेगाव
शहरात दोन महिन्यांपासून डेंग्यू व मलेरियाची साथ पसरल्याच्या पाश्र्वभूमीवर, पालिकेचा स्वच्छता विभाग अत्यंत चौकस होऊन कार्यप्रवण झाला असेल असाच कुणाचाही समज होऊ शकतो. मात्र या विभागातील वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी हा समज सपशेल खोटा ठरविल्याची बाब साहाय्यक आयुक्तांनी गुरुवारी सकाळी दिलेल्या अनपेक्षित भेटीच्या वेळी उघडकीस आली. या भेटीत सहापैकी दोन स्वच्छता निरीक्षक आणि सतरापैकी चक्क अकरा मुकादम गैरहजर असल्याचे आढळून आले असून त्यामुळे साथीच्या रोगांमुळे शहरात काहूर उठले असताना स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांना त्याचे काहीच सोयरसुतक नाही की काय, असा संशय निर्माण झाला आहे.
पालिकेचे साहाय्यक आयुक्त अशोक म्हसदे व मुख्य स्वच्छता निरीक्षक गोविंद परदेशी यांनी शहरातील सोनापुरा, नवापुरा, संगमेश्वर, इस्लामपुरा आदी भागांत अचानक भेटी देऊन तपासणी केली असता हा गंभीर प्रकार समोर आला आहे. कामगारांकडून स्वच्छतेचे काम करवून घेण्याची जबाबदारी असणारे वरिष्ठ कर्मचारीच जर असे ‘घाऊक’ पद्धतीने गैरहजर राहात असतील तर कामगार तरी कसे काम करतील, असा प्रश्न त्यामुळे उपस्थित केला जात असून या प्रकाराची गंभीर दखल घेत आयुक्त अजित जाधव यांनी या सर्वाना कारणे दाखवा नोटिसा बजाविण्याचे आदेश दिले आहेत.
शहरात यापूर्वी डेंग्यूमुळे नगरसेवक कन्येसह तीन जणांचा मृत्यू झाला असून साधारणत: ५० जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे निदान झाले आहे. दोन महिन्यांत मलेरियाच्या रुग्णांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. या पाश्र्वभूमीवर, महापालिका प्रशासनातर्फे शहरात युद्धपातळीवर स्वच्छता व धुरळणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. डासांचे प्रमुख उगमस्थान बनलेले मोसम नदी पात्रदेखील स्वच्छ करण्यात आले. यामुळे काही अंशी डासांचे प्रमाण कमी झाले तरी डेंग्यू व मलेरियाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे पालिकेतर्फे स्वच्छतेच्या बाबतीत आवश्यक ती खबरदारी घेण्याचा प्रयत्न करण्यात येत असून त्याचाच भाग म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांकरवी अचानक भेटी देऊन स्वच्छतेच्या कामाची तपासणी करण्यात येत आहे. अशाच भेटीत स्वच्छता निरीक्षक व मुकादम मोठय़ा प्रमाणावर गैरहजर आढळून आल्याने शहरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.