महिलांना समान संधी दिल्यास भारत विकसनशील देशांच्या पंक्तीत -सुप्रिया सुळे Print

वार्ताहर, सावंतवाडी

भारताने महिलांना समान संधी दिल्यास विकसनशील देशांच्या पंक्तीत भारत बसू शकतो, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी सिंधुदुर्ग राष्ट्रवादी युवती काँग्रेस मेळाव्यात व्यक्त केला. तसेच स्त्रीभ्रूण हत्येला हुंडा ही संस्कृती कारणीभूत असल्याचा नित्कर्ष त्यांनी काढला. युवती काँग्रेस संस्कृतीच्या चौकटीत राहून यापुढे काम करणार आहे. तसेच आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण शिक्षणासाठी आणण्याचा प्रयत्न केला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा मेळावा येथील बॅ. नाथ पै व्यासपीठ सभागृहात झाला, त्या वेळी जलसंपदामंत्री सुनील तटकरे, नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव, आमदार दीपक केसरकर यांनी मार्गदर्शन केले. युवतींनाही मत मांडण्याची संधी देण्यात आली.
या वेळी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्यात युवती, महिलांच्या छेडछाड प्रकरणात वाढ झाली आहे. त्या विरोधात सर्वानी एकजुटीने संघटित होऊन राज्य छेडछाडमुक्त करू या. त्यात सिंधुदुर्गने पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळवावे. राष्ट्रवादीने राज्यसेवा व लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या मार्गदर्शनाची सोय केलेली आहे, असेही त्या म्हणाल्या.
आर्थिक निकषांवर आधारित शिक्षणाचा अधिकार मिळून देण्यासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध आहे. विकसनशील देशांच्या स्पर्धेत उतरणाऱ्या भारताने पुरुषांप्रमाणे महिलांना समान संधी द्यावी, म्हणून शरद पवार यांनी युवतींसाठी स्वतंत्र व्यासपीठ उभे करून दिले आहे, असे त्या म्हणाल्या.
हुंडा देणे-घेणे हा गुन्हा असतानाही हुंडय़ासाठी पैसे किंवा सोने मागितले जाते. सोने हा हुंडाच आहे. त्यामुळे स्त्रीभ्रूण हत्येत वाढ झाली आहे. समाज परिवर्तन करताना संस्कृतीच्या चौकटीत राहून राष्ट्रवादी युवती काँग्रेस काम करेल, असे त्या बोलताना म्हणाल्या.
युवती मेळाव्यापूर्वी पत्रकार परिषदेमध्ये भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर पत्रकारांनी छेडले असता त्या म्हणाल्या, यापूर्वी शरद पवारांवर ट्रकभर पुरावे देणारे आरोप झाले, त्यांनी साध्या सायकलवरूनही पुरावा आणून दिला नाही. त्यामुळे कोणीतरी उठतो आणि ऊठसूट आरोप करतो. त्याच्यावर उत्तर देण्यापेक्षा लोकसेवा करण्यावरच राष्ट्रवादी अधिक लक्ष देते.
बचत गटांना व्हॅट लावण्यात आला आहे. त्यासंदर्भात त्या म्हणाल्या, बचत गटांनी व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी काम करावे, व्हॅट कमी करताना समतोल राखणे आवश्यक आहे. त्यामुळे बचत गटांना व्हॅट कमी केल्यास इतरही तशी मागणी करतील. मेगा फूड पार्क सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात व्हावा यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगून कुपोषण मुक्तीसाठी प्रयत्न सुरू आहेत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
केजरीवाल यांनी केलेल्या आरोपांवर बोलण्यापेक्षा जनतेत जाऊन काम करण्यावर राष्ट्रवादी काँग्रेस भर देत आहे, असे पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले. या वेळी आमदार दीपक केसरकर, आमदार निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस शिवराम दळवी, शंकर कांबळी, पुष्पसेन सावंत, नगराध्यक्ष बबन साळगावकर व मान्यवर उपस्थित होते.