‘एनडीसीए’तर्फे प्रथमच तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धा Print

प्रतिनिधी, नाशिक
आतापर्यंत प्रामुख्याने महानगरातील क्रीडागुण हेरणाऱ्या नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे (एनडीसीए) ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी मिळावी, या हेतूने प्रथमच तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. ‘किशोर सूर्यवंशी मेमोरियल चषक’  तालुकास्तरीय स्पर्धा होणार असल्याची माहिती जिल्हा संघटनेचे अध्यक्ष विनोद शाह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ग्रामीण भागातील क्रिकेटपटूंना आपले कौशल्य जिल्हा स्तरावर दाखविण्याची संधी मिळावी, या उद्देशाने प्रथमच संघटनेतर्फे अशा प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धेत पंधरा तालुक्यांचे संघ आणि मालेगावचे दोन संघ असे एकूण १६ संघ सहभागी होणार आहेत. २१ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत नाशिकमधील अनंत कान्हेरे आणि महात्मानगर येथील मैदानावर स्पर्धेतील सामने होणार आहेत. शनिवारी सायंकाळी सहा वाजता मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. या स्पर्धेसाठी जिल्हा संघटनेच्या माध्यमातून तालुकास्तरावर ६ व ७ ऑक्टोबर रोजी निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली. या चाचणी स्पर्धेसाठी एक हजार ९७२ खेळाडूंनी सहभाग घेतला. त्यातील ३२० खेळांडूची निवड करण्यात आली आहे. निवड चाचणीसाठी जिल्हा संघटनेच्या वतीने मान्यवरांनी निरीक्षकाची भूमिका पार पाडली.