शासकीय गलथानपणामुळे फौजिया खान संतप्त Print

प्रतिनिधी, नाशिक
अधिकाऱ्यांना शासकीय परीपत्रकाविषयी माहिती नसणे, नियोजनाचा अभाव, झिरो बॅलन्सविषयी झालेला घोळ, अधिकाऱ्यांकडून उत्तर देतांना होणारा गोंधळ, असा एकंदर शासकीय पातळीवरील गलथानपणाचा अनुभव खुद्द राज्यमंत्री फौजिया खान यांनीही घेतला. यामुळे संतप्त झालेल्या खान यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. पंतप्रधान पंधरा कलमी कार्यक्रमाअंतर्गत योजनांचा आढावा घेण्यासाठी येथे आयोजित बैठकीत अल्पसंख्याकांचा एकही प्रतिनिधी उपस्थित नसल्याचे पाहून खान यांच्या संतापात अधिकच भर पडली.
विविध शासकीय योजनांचा आढावा घेण्यासाठी सामान्य प्रशासन, सांस्कृतिक कार्य, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण यांसह अल्पसंख्यांक विकास, अशी जबाबदारी पेलणाऱ्या राज्यमंत्री फौजिया खान यांनी शुक्रवारी जिल्हा दौरा केला. प्रारंभी त्यांनी सकाळी जिल्हा रुग्णालयास भेट देऊन तेथील समस्यांची पाहणी केली. रूग्णालयाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करतानाच रूग्णांची विचारपूस केली. त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. दुपारी फेडरेशन ऑफ ऑल मायनॉरीटी एज्युकेशनल ऑर्गनायझेशनच्या सदस्यांसमवेत चर्चा तसेच इतर विषयांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत अल्पसंख्याकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी एकही प्रतिनिधी उपस्थित नसल्याने खान यांनी आश्चर्य व्यक्त केले. सरकारच्या वतीने अल्पसंख्याकांसाठी पंतप्रधान पंधरा कलमी योजनेतंर्गत ठेवण्यात येणाऱ्या १५ टक्के राखीव निधीविषयी पदाधिकाऱ्यांना कोणतीही माहिती नसल्याचे चर्चेत दिसून आले. आपल्यापर्यंत असे कुठलेही परीपत्रक आले नसल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर खान या चकित झाल्या.