अभ्यासक्रम आराखडय़ावरील चर्चा ठरल्या निव्वळ फार्स! Print

बेरीज-वजाबाकी नव्या अभ्यासक्रमाची - भाग २
रसिका मुळ्ये , पुणे

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद आणि विद्या परिषदेने (एससीईआरटी) महाराष्ट्र राज्यासाठी पहिली ते आठवीचा अभ्यासक्रम नव्याने तयार केला खरा, पण विद्यार्थ्यांशी थेट संबंध येणारे बहुतांश शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील अनेक घटकांपर्यंत तो पोहोचलेलाच नाही. इतकेच नव्हे तर त्यावर जिल्हा व विभागीय पातळीवर चर्चा घडवून आणण्याच्या कार्यशाळासुद्धा निव्वळ फार्सच ठरल्या.
आराखडा तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यांना सामावून घेणे शक्य नसले, तरी तो तयार झाल्यावर शिक्षणक्षेत्रातील अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा, यासाठी एससीईआरटीने विशेष परिश्रम घेतल्याचे दिसले नाही.
हा आराखडा लोकांपर्यंत पोचवण्याच्या दृष्टीने एससीईआरटीने पहिल्या टप्पामध्ये जिल्हास्तरावर विविध कार्यशाळा आणि विभागीय बैठकांचे आयोजन केले होते. मात्र, या कार्यशाळेमध्ये उद्घाटन सत्र, अधिकाऱ्यांची भाषणे, जेवण, चहापाणी अशा भरगच्च कार्यक्रम पत्रिकेत प्रत्यक्ष आराखडय़ावर चर्चा करण्यासाठी शिक्षकांना जेमतेम दीड-दोन तास मिळत होते. त्यामुळे  नुकताच हातात पडलेला १४०० पानांचा आराखडा वाचून, समजून घेऊन त्यावर काही मतप्रदर्शन करणे अशक्य असल्यामुळे या कार्यशाळांमधून या आराखडय़ाबाबत फारशी चर्चा किंवा वैचारिक देवाण-घेवाण झाली नाही.
विभागीय बैठकांमध्ये शिक्षक आमदार, जिल्हा शिक्षण अधिकारी व इतर अधिकारी, शिक्षक-पालक संघाचा एक प्रतिनिधी आणि संपूर्ण जिल्ह्य़ातून दोन प्राथमिक आणि दोन माध्यमिक शिक्षक यांना बोलवण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये हा आराखडा संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला. मात्र त्यामुळे तालुका किंवा गावपातळीवरील शिक्षकांपर्यंत तो पोहोचलेला नाही. शासकीय ग्रंथालये, ग्रामपंचायत, पंचायत समिती अशा ठिकाणीही हा आराखडा उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. त्यामुळे गेली चार वर्षे हा आराखडा तयार करण्यासाठी एससीईआरटी काम करत आहे. मात्र, विद्यार्थ्यांशी रोजचा संबंध येणारे बहुतांश शिक्षक या नव्या अभ्यासक्रमाबाबत संपूर्ण अनभिज्ञच आहेत.    
इतर मातृभाषा असलेले विद्यार्थी इंग्रजीकडे?
मराठीशिवाय इतर मातृभाषा असलेल्या विद्यार्थ्यांने मराठी माध्यमात प्रवेश घेतला तर त्याला दुसरी भाषा म्हणून त्यांची मातृभाषा निवडण्याची संधी नववीपर्यंत मिळत नाही. मात्र, त्याने इंग्रजी माध्यमात प्रवेश घेतला तर त्याला पाचवीपासूनच त्याची मातृभाषा शिकता येते. त्यामुळे इतर मुलांना स्वत:ची मातृभाषा शिकायची असेल तर त्यांचा कल इंग्रजी माध्यमात प्रवेश घेण्याकडेच असतो. या वेळी अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करताना या मुद्दय़ाकडे लक्ष देऊन मराठी माध्यमातही इंग्रजी माध्यमाप्रमाणे सुधारणा करून घेतल्या तर ते मराठी माध्यमासाठी फायदेशीर ठरेल. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेतून हा मुद्दा दुर्लक्षितच राहिला आहे.