विजय दर्डा यांना गंडविणाऱ्या ठकसेनास अटक Print

प्रतिनिधी, सोलापूर
मोबाइलद्वारे गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा हुबेहूब आवाज काढून खासदार विजय दर्डा यांना तब्बल ३४ लाखांना गंडा घातल्याप्रकरणी अक्कलकोटच्या दिगंबर ऊर्फ बाळासाहेब खैरे-पाटील (वय ३६) यास पोलिसांनी ताब्यात घेतले. हा फसवणुकाचा प्रकार पुण्यात घडला असून याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तथापि, खैरे यास सोलापूर ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेऊन पुणे शहर पोलिसांच्या हवाली करीत असताना त्यास फिट्ससह अन्य दुर्धर आजार असल्याचे आढळून आल्याने त्याला सोलापूरच्या छत्रपती शिवाजी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
खैरे-पाटील याने खासदार दर्डा यांनाच नव्हे तर अन्य काही बडय़ा राजकीय पुढाऱ्यांनाही ज्येष्ठ नेत्यांचे हुबेहूब आवाज काढून फसविल्याचे आढळून आले आहे. यात काही ज्येष्ठ मंत्र्यांचाही समावेश असल्याचे बोलले जाते. अशाच एका गुन्ह्य़ात त्यास यापूर्वी उस्मानाबाद पोलिसांनी अटक केली होती. गुरुवारी अक्कलकोट येथे त्यास पकडल्यानंतर पोलिसांनी त्याच्या ताब्यातून सात लाख ६० हजारांची रोकड व ११ लाखांचे सोने हस्तगत केले. तथापि, खैरे-पाटील याने आपल्या गुन्हेगारी कारवायातून सहीसलामत सुटण्यासाठी अगोदरच पळवाटा शोधून काढल्या असून आपला मोबाइल पंधरा दिवसांपूर्वी हरविल्याची तक्रार त्याने केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या गुन्ह्य़ाची उकल करताना पोलीस यंत्रणेची कसोटी लागणार असल्याचे सांगितले जात आहे.