नवा अभ्यासक्रम आराखडा ही केंद्राची आंधळेपणाने केलेली ‘कॉपी’! Print

बेरीज-वजाबाकी नव्या अभ्यासक्रमाची - भाग ३
रसिका मुळ्ये, पुणे

राज्याचा पहिली ते आठवीचा नवा अभ्यासक्रम आराखडा हा ‘नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क २००५’ या केंद्राच्या आराखडय़ाची आंधळेपणाने केलेली ‘कॉपी’ असून, राज्याच्या या आराखडय़ाला अंतिम मंजुरी देण्यापूर्वी त्यावर सखोल चर्चा आवश्यक आहे, असे मत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) राज्यासाठी पहिली ते आठवीचा अभ्यासक्रम आराखडा नव्याने तयार केला आहे. त्यावर  तज्ज्ञांनी परखड भाष्य केले आहे.
‘परिसर अभ्यासाचे पालकत्व कोणाचे?’
या आराखडय़ातील परिसर अभ्यास आणि विज्ञान विषयाच्या आराखडय़ाबाबत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व विज्ञानशिक्षक डी. आर. पाटील यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी परिसर अभ्यास या विषयाचा मूळ उद्देश हा स्वतची, परिसराची, आजूबाजूच्या वातावरणाची ओळख व्हावी हा आहे. जेणेकरून त्यांच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट होतील. मात्र, नवीन आराखडा या उद्देशाला न्याय देणारा नाही. या विषयामध्ये इतिहास, भूगोल, पर्यावरण, नागरिक शास्त्र, विज्ञान या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याच विषयाला पुरेसा न्याय मिळालेला नाही. परिणामी परिसर अभ्यास या विषयाचे पालकत्व नक्की कोणत्या विषयाच्या शिक्षकाने उचलायचे, असा प्रश्न निर्माण होणार आहे. पाचवी ते आठवीच्या विज्ञान विषयाच्या आराखडय़ामध्येही खूप त्रुटी आढळतात. एका इयत्तेमध्ये एका संकल्पनेची ओळख करून देणे, पुढच्या इयत्तेमध्ये ती पूर्णपणे शिकवणे, त्यानंतर पुढील संकल्पनेची ओळख करून देणे अपेक्षित आहे. मात्र विज्ञान विषयामध्ये ही सुसूत्रता दिसत नाही.’’
‘मराठी आणि हिंदी भाषा
हातात हात घालून शिकवाव्यात’
हिंदी भाषेच्या आराखडय़ाबाबत पुण्यातील ‘ऐक्यभारती’ च्या संचालक दुर्गा दीक्षित यांनी सांगितले, ‘‘मराठी ही मातृभाषा असलेल्या पहिलीतील विद्यार्थ्यांला मराठी भाषेचे आकलन अधिक लवकर होते, त्या तुलनेने दुसऱ्या एखाद्या भाषेचे आकलन होण्यास वेळ लागतो. त्याचप्रमाणे मराठी येते म्हणून मराठीतून एखादी संकल्पना मांडली, तर भाषा येते म्हणून संकल्पना कळेल असे नाही. भाषेचा अभ्यास आणि संकल्पनेचा अभ्यास या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. या मुद्दय़ाचा आराखडय़ामध्ये विचार झालेला दिसत नाही. मातृभाषा म्हणून मराठी आणि राष्ट्रभाषा म्हणून हिंदी या दोन्ही भाषा हातात हात घालून शिकणे आवश्यक आहे. मात्र, दोन्ही भाषांचा अभ्यास एकत्रित करणे म्हणजे मराठीतील धडे हिंदीमध्ये भाषांतरित करून पुस्तकात देणे असा अर्थ नाही, तर भाषांमधील परस्पर संबंध आणि त्या अनुषंगाने दोन्ही भाषांची संस्कृती विद्यार्थ्यांना कळणे आवश्यक आहे.’’
‘कलेच्या माध्यमातून शिक्षण’ याचा विचार हवा
 कला आणि शारीरिक शिक्षण या विषयाच्या आराखडय़ाबाबत अभिनव महाविद्यालयाचे कलाशिक्षक तसेच, बालभारती आणि एमएसईबीटीईचे अभ्यासक्रम मंडळाचे सदस्य सुधाकर चव्हाण म्हणाले, ‘‘हा आराखडा मुळात अभ्यासक्रम नाही, तर पाठय़क्रम आहे. विद्यार्थ्यांनी प्रत्येक दिवशी काय करावे किंवा शिक्षकांनी काय करून घ्यावे एवढेच त्यात मांडले आहे. हा आराखडा तयार करताना त्या त्या विषयातील तज्ज्ञांना सहभागी करून घेण्याची गरज होती. कला अभ्यासाच्या बाबतीत बोलायचे झाले, तर ‘कलेच्या माध्यमातून शिक्षण’ ही संकल्पना कला अभ्यासाच्या मुळाशी हवी. विद्यार्थ्यांना व्यक्त होण्यासाठी कला हे एक माध्यम आहे, या दृष्टिकोनातून आराखडय़ामध्ये विचार झालेला दिसत नाही. त्यामुळे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना मुक्तपणे व्यक्त होण्याची मुभा देण्याची गरज आहे. या वयोगटातील विद्यार्थ्यांकडून माध्यम, शैली, आकृतीबंध, याबाबत आग्रह असू नये. विद्यार्थ्यांना व्यक्त होता आले की त्यानंतरच विद्यार्थ्यांना तांत्रिक संकल्पनांची ओळख करून देण्यात यावी.’’