नडगावतर्फे बिरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना काँग्रेसमध्ये लढत Print

अलिबाग
तालुक्यातील नडगाव तर्फे बिरवाडी ग्रामंपचातच्या चारही प्रभागांतून काँग्रेसच्या विरोधात शिवसेना उमेदवारांनी प्रचारामध्ये आघाडी मिळविली आहे. ४ प्रभागांतून १३ सदस्यांची निवड करण्यासाठी निवडणूक रिंगणामध्ये एकूण १९ उमेदवार आहेत. प्रत्येक प्रभागातून शिवसेनेच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार जरी उभे केले असले, तरी आगामी निवडणुकींमध्ये शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास तालुक्याचे शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी व्यक्त केला आहे.
महाड औद्योगिक वसाहतीमुळे नडगाव ग्रामपंचायतीचे महत्त्व वाढल्यानंतर पंचायतीवर शिवसेनेने आपली पक्कड कायम राखली. आगामी निवडणुकींमध्ये शिवसेनेच्या विरोधात प्रत्येक प्रभागातून काँग्रेसने जरी उमेदवार उभे केले असले, तरी पंचायतीमध्ये शिवसेनेचे उमेदवार बहुमताने निवडून येतील असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. प्रभाग १ मध्ये काँग्रेसचे नरशोत्तम मांडे यांच्या विरोधात शिवसेनेचे शरद मांडे निवडणूक लढवीत आहेत. याच प्रभागामध्ये नाममात्र प्रवर्ग महिला मतदारसंघातून रंजिता केळसकर यांच्या विरोधात शिवसेनेच्या कोमल सुतार आहेत. प्रभाग २ मधून सर्वसाधारण प्रवर्गातून अपक्ष निवडणूक लढविणाऱ्या अनिता मांडे यांच्या विरोधात शिवसेनेच्या दर्शना बारणे लढत देत आहेत. दोन उमेदवारांची बिनविरोध निवड झाली असून प्रभाग ३ मधून शिवसेनेचे तीन आणि काँग्रेसचे तीन उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. काँग्रेसने जरी एकास एक उमेदवार उभा केला असला तरी सर्व प्रभागांमध्ये शिवसेनेचे वर्चस्व आहे. सर्वसाधारण प्रवर्गातून काँग्रेसचे तुकाराम तांबे, तर शिवसेनेचे दशरथ महाडिक निवडणूक लढवीत आहेत. सर्वसाधारण स्त्री राखीव प्रवर्गात महाडिक पूजा आणि महाडिक हर्षला या शिवसेना उमेदवारांच्या विरोधात पुन महाडिक आणि स्मिता सारंग या काँग्रेस उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. प्रभाग ४ मध्ये शिवसेनेचे नरेश पवार काँग्रेसचे शंकर शिर्के यांच्यामध्ये लढत होणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गामध्ये संजय देशमुख, नथुराम महाडिक, संतोष महाडिक , तर सर्वसाधारण महिला प्रवर्गामध्ये सुरेखा जगताप काँग्रेस आणि रेणुका देशमुख शिवसेना यांचा सरळ सामना होणार आहे. नडगाव ग्रामपंचायत मागील निवडणुकींमध्ये काँग्रेसकडून शिसनेनेने जिंकून घेतल्यानंतर विद्यमान सरपंच राजेंद्र मांडे यांनी गावाच्या विकासासाठी अनेक योजना कार्यन्वित केल्या. मांडे यांच्या कारकीर्दीतच ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर गाव तंटामुक्त हागणदारीमुक्त केल्यानंतर राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर पंचायतीला गौरविण्यात आले. २१ ऑक्टोबर रोजी होणारी निवडणूक अटीतटीची वाटत असली तरी १३ पैकी १० पेक्षा अधिक जागा शिवसेनेकडे येतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तालुक्यातील कांबळे तर्फे बिरवाडी, दासगाव, अप्पर तुडील, लोअर तुडील आणि वरंध या ग्रामपंचायतींमध्ये देखील काँग्रेस, शिवसेना उमेदवारांमध्ये लढती होत आहेत. दासगाव पंचायतीवर काँग्रेसची सत्ता होती, या वेळी बदल होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे अप्पर तुडील आणि लोअर तुडील पंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्व असल्याने शिवसेनेदेखील पंचायतीच्या कारभाराकडे कायम दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम भविष्यामध्ये सहन करावा लागला.