अंजली दमानियांनी अडवला गावकऱ्यांच्या स्मशानभूमीचा रस्ता Print

प्रतिनिधी
अलिबाग    
इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या नेत्या अंजली दमानिया पुन्हा एकदा अडचणीत आल्या आहेत. अंजली दमानिया यांनी कर्जत तालुक्यात कोंडीवडे ग्रामपंचायत हद्दीतील खरवंडी गावाच्या स्मशानभूमीकडे जाणारा रस्ताच बंद केल्याची बाब समोर आली आहे. याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या गावच्या सरपंच आणि गावकऱ्यांना अंजली दमानिया यांनी धमकावल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
  रायगड जिल्ह्य़ातील कर्जत तालुक्यात सध्या जागेला चांगला भाव आहे. त्यामुळे रीअल इस्टेट व्यावसायिकांचा डोळा सध्या इथल्या जागेवर आहे. अंजली दमानिया यादेखील यांपैकी एक असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावाने जागा घेऊन ती बिनशेती करून विकण्याचा व्यवसाय दमानिया करत असल्याचा आरोप कोंढाणे परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे. त्याचबरोबर दमानिया यांनी कोंडीवडे ग्रामपंचायत हद्दीतील खरवंडी गावाच्या स्मशानभूमीकडे जाणारा रस्ताही बंद केल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे. एवढेच नव्हे तर आमचा पारंपरिक स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता बंद करू नका, असे सांगण्यास गेलेल्या सरपंच मधुकर घोरे यांना आणि गावकऱ्यांना अंजली दमानिया यांनी धमकावल्याचाही आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
सरपंच घोरे यांना, पुन्हा इथे आलास तर तुझे पद घालवीन, अशी धमकी दिल्याचे घोरे यांनी स्पष्ट केले. गावकरी आणि दमानिया यांच्यातील तंटा मिटावा आणि स्मशानभूमीला रस्ता मिळावा यासाठी आजवर अनेक प्रयत्न झालेत. मात्र अंजलीताईंनी त्याला जुमानलेल नाही. त्यामुळे गावात एखादे मयत झाले तर स्मशानभूमीत जाण्यासाठी गावकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. अंजलीताईंनी किमान स्मशानभूमीला जाण्या-येण्यासाठी रस्ता द्यावा, अशी विनंती त्यांनी केली.  गावाला धरण पाहिजे आहे. अंजली दमानिया यांची ३० एकर जागा त्या धरणात झाणार आहे. ही वस्तुस्थिती आहे. पण माझी जमीन जाते आहे म्हणून धरणच होऊ देणार नाही, ही भूमिका चुकीची आहे असेही स्थानिक बबन गायकवाड यांनी सांगितले आहे.