महाड औद्योगिक वसाहतीमधील कंत्राटी कामगारांना बोनस देण्याची मागणी Print

महाड, २१ ऑक्टोबर :
महाड औद्योगिक वसाहतीमध्ये प्रत्येक कारखान्यांमध्ये कंत्राटी कामगारांकडून बारा बारा तास काम करून घेतले जाते. त्या मोबदल्यामध्ये पुरेसे वेतन दिले जात नाही. शासनाच्या यमाप्रमाणे ज्या सवलती देणे आवश्यक आहे, त्यापासून कायम वंचित ठेवण्यात आले असल्याने दिवाळीपूर्वी कंत्राटी कामगारांना बोनस देण्यात यावा, अशी मागणी भारतीय मजदूर संघ या कामगारांच्या संघटनेने केली आहे. येथील औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या रासायनिक कारखान्यांमध्ये पाच हजारांपेक्षा अधिक कंत्राटी कामगार काम करीत आहेत.
राजकीय वरद्हस्त असलेले कंत्राटी कामगारांच्या ठेकेदारांकडून त्यांची कायम पिळवणूक केली जात असताना कारखानदारदेखील त्यांना सहकार्य करीत असतात. त्यांना कोणत्याही स्वरूपाची सवलत दिली जात नाही, त्याचप्रमाणे आठवडय़ाची सुट्टी देताना वेतनामध्ये कपात केली जाते. रायगड मजदूर संघाने कंत्राटी कामगारांना नियमाप्रमाणे सवलती, २० टक्केबोनस, तसेच वेतनाची मागणी येथील औद्योगिक वसाहतीमधील कारखानदारांकडे केली आहे.