महाड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत ७५ टक्के मतदान Print

महाड
महाड तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतींचे मतदान शांततेत पार पाडले. संध्याकाळपर्यंत निश्चित आकडेवारी उपलब्ध झाली नसली तरी सरासरी तालुक्यामध्ये ७५ टक्के मतदान झाले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेना, काँग्रेस पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावलेल्या कांबळे तर्फे बिरवाडी, वरंध, तुडील, दासगाव, नडगाव तर्फे बिरवाडी या ग्रामपंचायतींमध्ये विक्रमी  मतदान झाले आहे. तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींची बिनविरोध निवड झाल्याने ४६ ग्रामपंचायतींमधील उमेदवारांचे भवितव्य पेटीबंद झाले आहे. उद्या सकाळी आठ वाजल्यापासून येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये मतमोजणीला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती प्रियांका कांबळे यांनी दिली.
महाड तालुक्यातील एकूण ७३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्यांपैकी २७ ग्रामपंचायतींमधील सदस्यांची निवड गावपातळीवर बिनविरोध करण्यात आली. उर्वरित ४६  ग्रामपंचायतींचे मतदान आज शांततेमध्ये पार पडले. एकूण १०९ प्रभागांमध्ये २८४ सदस्यांची निवड होणार आहे. त्यासाठी ५१० उमेदवारांचे भवितव्य आज संध्याकाळी ५ वाजता पेटीबंद झाले. संपूर्ण तालुक्यातील ग्रामपंचायतींमधील मतदानाची आकडेवारी रात्री आठ वाजेपर्यंत उपलब्ध झाली नाही; परंतु दुपारी ३.३० वाजेपर्यंत तालुक्यामध्ये ६६.८१ टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली. मतदानाची वेळ संपल्यानंतर माहिती घेतली असता सरासरी ७५ टक्के मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.
तालुक्यातील प्रतिष्ठेची ग्रामपंचायत असलेली कांबळे तर्फे बिरवाडीमध्ये तीन प्रभागांतून ९ सदस्य निवडून येणार आहेत, त्यासाठी १८ उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रस पक्षाची सत्ता असलेल्या पंचायतीवर कोणाची सत्ता येणार, याकडे तालुक्यातील राजकीय नेत्यांचे लक्ष लागले असून ७५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले. वरंध ग्रामपंचायतीमध्ये ८० टक्के, दासगावमध्ये ७० टक्के, तुडीलमध्ये ६५ टक्के, तर नडगावमध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले. तालुक्यातील काही प्रमुख ग्रामपंचायती सोडल्या तर उर्वरित पंचायतींमध्ये मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण कमी होते.
अनेक ठिकाणी उमेदवार जरी कोणत्याही पक्षाचा असला तरी गावपातळीवर पाठिंबा देण्यात आल्याने कोण कोणत्या पक्षाचा उमेदवार आहे हे सांगणे कठीण आहे. परंतु शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्ते उमेदवारांच्या बाबतीत आपल्याच पक्षाचा असल्याचा दावा करताना दिसून येतात. आज झालेल्या मतदानामध्ये अनेक ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर होण्याची शक्यता असून निकाल धक्कादायक लागतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.