चोरटय़ांच्या हल्ल्यात एक जण गंभीर Print

वार्ताहर
मालेगाव
शहराजवळ असलेल्या वऱ्हाणे शिवारात शनिवारी पहाटे तीन चोरटय़ांनी दयाराम रूपा वाघ (५५) यांच्यावर चाकूचे वार करीत सुमारे ४० हजारांचे दागिने लुटून नेल्याची घटना घडली. जखमी शेतकऱ्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शेतातील घरात वास्तव्यास असलेल्या वाघ यांचा मुलगा व सून गावी गेले असताना घरात ते आणि त्यांची पत्नी असे दोघेच होते. पाठीमागील बाजूच्या दरवाजाने घरात शिरलेले चोरटे कपाटातील वस्तू काढत असताना वाघ यांना जाग आली. दागिने घेऊन पळ काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांपैकी एकाला त्यांनी घट्ट पकडून ठेवले. त्यामुळे अन्य दोघे चोरटे माघारी परतले व त्यांनी चाकूने वाघ यांच्यावर वार केले. गंभीर जखमी झालेले वाघ जमिनीवर कोसळल्यानंतर चोरटे पसार झाले. जखमी अवस्थेत वाघ यांनी भ्रमणध्वनीद्वारे तालुका पोलिसांशी संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.