गंगापूर धरण परिसर पर्यटनस्थळ जाहीर करण्यास ‘जनराज्य’चा विरोध Print

प्रतिनिधी
नाशिक
धरणाच्या सुरक्षिततेत वाढ होण्याची गरज असताना येथील गंगापूर धरणाजवळील परिसर पर्यटनस्थळ म्हणून आरक्षित करू नये, अशी मागणी जनराज्य आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे. प्रदेश खजिनदार आदित्य जगन्नाथ, शहराध्यक्ष नीलेश साळुंखे, युवकचे अध्यक्ष किशोर राजगुरू, संतोष गोसावी, नाशिकरोड महिला आघाडी अध्यक्षा जयश्री आढाव, पंचवटी ब्लॉक अध्यक्ष मोतीराम पिंगळे, पूर्व विभागप्रमुख चंद्रकांत आल्हाट, नाशिकरोड ब्लॉक अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, सिडको विभाग अध्यक्ष राजाभाऊ सौदे, पश्चिम विभागप्रमुख धनंजय निकाळे, सातपूर ब्लॉक अध्यक्ष मोतीराम पिंगळे आदींनी जिल्हाधिकारी, विलास पाटील, विभागीय आयुक्त रवींद्र जाधव यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन निवेदन सादर केले.
शहराच्या औद्योगिक, भौगोलिक विकासात गंगापूर धरण हा महत्त्वाचा घटक असून धरणाच्या पाण्यावर नाशिकची तहान भागविली जाते. कृषी व औद्योगिक क्षेत्रासाठी गंगापूर धरण महत्त्वपूर्ण असल्याने या प्रकल्पाची सुरक्षितता हा अतिशय गांभीर्याचा विषय आहे. धरणाच्या सुरक्षिततेत वाढ होणे गरजेचे असताना याठिकाणी पर्यटनस्थळ करण्याचा घाट घातला जात आहे. हे सुरक्षितता व नाशिक जिल्ह्य़ाच्या दृष्टीने भविष्यात घातक ठरू शकते. नाशिककरांच्या हितासाठी गंगापूर धरण व बाजूच्या परिसरात पर्यटनस्थळ करण्यास तीव्र विरोध असून शासनाने याठिकाणी पर्यटनस्थळास मान्यता देऊ नये. तसे केल्यास जनराज्य आघाडीच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. शहराध्यक्ष नीलेश साळुंखे, प्रदेश खजिनदार आदित्य जगन्नाथ, युवक शहराध्यक्ष किशोर राजगुरू यांनी जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांच्याशी चर्चा करून गंगापूर पर्यटन विकासाऐवजी जिल्ह्य़ातील इतर धरणांच्या परिसरात अशा प्रकारे पर्यटन विकासाची योजना राबविण्यासाठी आलेला निधीही जिल्ह्य़ातील पर्यटन विकासासाठी वापरता येऊ शकेल, अशी मागणी केली. जिल्हाधिकारी विलास पाटील व विभागीय आयुक्त रवींद्र जाधव यांनी शासनदरबारी याविषयी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.