वाघदर्डी जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड Print

वार्ताहर, मनमाड
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघदर्डी धरणाजवळील शुद्धीकरण यंत्रणेत बिघाड झाल्याने नागरिकांना सध्या १५ ते २० दिवसांआड मिळणारे पाणी केवळ ब्लिचिंग पावडर आणि तुरटी टाकून मिळत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील काही नागरिकांनी येथील वाघदर्डी जलशुद्धीकरण केंद्र आणि धरणाची पाहणी केली असता त्यांना हे धक्कादायक चित्र पाहावयास मिळाले. पालिका प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे आणि नगरसेवक व लोकप्रतिनिधींचे या विषयाकडे होणारे दुर्लक्ष, यामुळे दूषित पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून त्यामुळे शहरात गॅस्ट्रो, कावीळ, कॉलरा यांसारख्या रोगांची लागण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाने याची गंभीरपणे दखल घेऊन संबंधितांविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी या नागरिकांनी केली आहे.