रोहे औद्योगिक वसाहतीमधील सांडपाणी वाहिन्यांना मंजुरी Print

रोहे
रोहे औद्योगिक वसाहतीमधील चाळीस वर्षे वापरात असल्याने जुन्या जीर्ण झालेल्या सांडपाणी वाहिन्या बदलण्याची रोहे इंडस्ट्रीज असोसिएशनची मागणी मंजूर झाली असून एम.आय.डी.सी.ने ६० कोटी रुपये मंजूर केलेल्या या कामाची सुरुवात करण्यात आली आहे. माजी केंद्रीय अर्थमंत्री कै. सी. डी. देशमुख यांच्या पुढाकाराने १९६८ साली राज्यातील पहिली औद्योगिक वसाहत रोहे धाटाव येथे स्थापन झाली. शासनाने रासायनिक झोन जाहीर केल्यामुळे वसाहतीमध्ये मोठय़ा प्रमाणावर रासायनिक कारखाने उभे राहिले व त्यामुळे जलप्रदूषणाची मोठी समस्या उभी राहिली. एम.आय.डी.सी.ने वसाहतीचे सांडपाणी रोहे शहरापासून केवळ ३ कि.मी. अंतरावर कुंडलिका नदीमध्ये सोडल्याने प्रदूषणाच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले. प्रदूषणाने आरे गावापासून पुढे व झोळांबे खारापटीपासून पुढे शेकडो एकर शेती उद्ध्वस्त झाली. या प्रश्नावर १९८४ साली महाराष्ट्र राज्य मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष व शे.का.पक्षाचे आमदार भाई बंदरकर व व्ही.टी. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व मच्छीमार बांधवांचे  आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनाची दखल घेऊन केंद्र सरकारच्या पथकाने पाहणी करून वसाहतीचे सांडपाणी दूरवर खाडीमध्ये पोशिरे बंदर येथे सोडण्याची शिफारस केली होती. आज ३० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शासनाने या प्रश्नावर कार्यवाही सुरू केली आहे. वसाहतीपासून उचरे गावापर्यंतची सांडपाणी वाहिनी बदलण्यासाठी १२ कोटी ५० लाख रुपये, आरेपासून पुढे पोशिरे बंदपर्यंत नवीन वाहिनी टाकण्यासाठी २८ कोटी रुपये, वसाहतीमधील अंतर्गत जलवाहिन्या बदलण्यासाठी ४ कोटी ५० लाख रुपये, कंपन्यांना उत्पादनासाठी लागणारे पाणी पुरविणाऱ्या जुन्या वाहिन्या बदलण्यासाठी ५ कोटी रुपये, या कामामुळे खराब होणारे रस्ते सुधारण्यासाठी ४ कोटी रुपये, पावसाळी वसाहतीमधील पाणी वाहून नेणारे ओहोळ व नाले दुरुस्तीसाठी १ कोटी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले .