सिंधुभूमी कला अकॅडमीच्या ‘मुक्ती’ लघुपटाची आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड Print

वार्ताहर, सावंतवाडी
सिंधुभूमी कला अकॅडमीतर्फे आयोजित व प्रायोजित करण्यात आलेल्या फिल्ममेकर प्रशिक्षण शिबिरात सिंधुदुर्गातील मुला-मुलींनी बनविलेल्या ‘मुक्ती’ या पहिल्या लघुपटाची गोवा येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली आहे.
आमदार प्रमोद जठार यांच्या पुढाकाराने सिंधुभूमी कला अकॅडमीची निर्मिती झाली आहे. एकूण १४७ आंतरराष्ट्रीय लघुपटांमधून १९ लघुपटांची गोव्यातील महोत्सवात निवड झाली. त्यात सिंधुदुर्गच्या ‘मुक्ती’चा समावेश आहे. २० ते ३० नोव्हेंबर या कालावधीत गोवा येथे हा महोत्सव होणार आहे.
सिंधुभूमी कला अकॅडमीच्या जुलै २०११ ते नोव्हेंबर २०११ या कालावधीत आयोजित केलेल्या फिल्ममेकिंग शिबिरात ‘मुक्ती’ हा चित्रपट बनविण्यात आला होता. स्पंदन परिवार सिनेमा मूव्हमेंट या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्गातील मुला-मुलींना सिनेमा बनविण्याचे तंत्र शिकविले होते.
सिंधुदुर्गातील कलाकारांनी आणि चित्रपट बनविणाऱ्या मुलांनीही सिंधुदुर्गातील असलेल्या ‘मुक्ती’ नावाच्या लघुपटाने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झेप घेतली आहे. त्यामुळे आमदार प्रमोद जठार यांची दूरदृष्टीला यश मिळाल्याचे मानले जाते.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात गुणी कलाकार आहेत. त्यांना व्यासपीठ मिळाल्यास त्यांची झेप द्विगुणित होऊ शकते, म्हणून आ. प्रमोद जठार यांनी सिंधुभूमी कला अकॅडमी संस्थेची स्थापना केली. ‘स्पंदन’चे प्रमुख अमरजीत आमले यांनी जिल्ह्य़ातील मुलांकडून लघुपट बनवून घेतला.
सिंधुभूमी कला अकॅडमीची जबाबदारी सांभाळणारे गणेश साळुंखे यांनी या लघुपटाच्या यशासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.