देशात मध्यावधी निवडणुकांची दाट शक्यता - खा. प्रकाश जावडेकर Print

खास प्रतिनिधी, रत्नागिरी

देशात बोकाळलेली महागाई आणि भ्रष्टाचाराच्या पाश्र्वभूमीवर मध्यावधी निवडणुका होण्याची दाट शक्यता भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केली आहे. काही कार्यक्रमानिमित्त येथे आलेले खासदार जावडेकर आज येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, १९७७ आणि १९८९ या दोन्ही निवडणुकांना केंद्र सरकारच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाची पाश्र्वभूमी होती. आताही तशीच परिस्थिती निर्माण झाली असून महागाई आणि भ्रष्टाचाराचा अतिरेक झाला आहे. सध्याचे केंद्र सरकार या दोन्ही आघाडय़ांवर पूर्णपणे अपयशी ठरले असून येत्या हिवाळी अधिवेशनानंतर ते स्थिर राहण्याची शक्यता नाही. त्यामुळे देशात मध्यावधी निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे. अशा प्रकारे महागाईच्या पाठीवर बसून भ्रष्टाचार बोकाळतो तेव्हा सत्तांतर निश्चित असते. १९७७ च्या निवडणुकीत जयप्रकाश नारायण, तर १९८९ च्या निवडणुकीत विश्वनाथ प्रतापसिंग या दोघांभोवती भ्रष्टाचारविरोधी आंदोलन केंद्रित झाले होते. खरे तर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना तशा प्रकारची भूमिका बजावण्याची संधी होती, पण त्यांनी गैरकाँग्रेसी राजकारण केले नाही. त्यामुळे सध्या तरी तशी कोणी व्यक्ती दिसत नाही. पण परिस्थितीतून नेतृत्व निर्माण होऊ शकते. सत्ताधारी काँग्रेस आघाडीचा सर्वात विश्वासू साथीदार सीबीआय असून या यंत्रणेच्या मदतीने सपा, बसपा, द्रमुक इत्यादी पक्षांना आपल्या तालावर नाचवले जात आहे, अशीही टिप्पणी जावडेकर यांनी केली.
घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून ते पुढे म्हणाले की, सिलेंडरची अल्प प्रमाणात दरवाढ समजण्यासारखी होती, पण केंद्र सरकारने दुपटीपेक्षा जास्त किंमत वाढवली असून त्यातील सवलतींबाबत कमालीची गोंधळाची परिस्थिती आहे. सोनियाजींचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्या जमीन व्यवहारांच्या घोटाळ्यांमुळेही केंद्र सरकार अडचणीत आले आहे.
महाराष्ट्रातील काँग्रेस आघाडीचे सरकार म्हणजे अलिबाबा आणि चाळीस चोरांची कथा असल्याची टीका करून जावडेकर म्हणाले की, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखालील पश्चिम घाट तज्ज्ञ समितीने केलेल्या शिफारशींबाबत सध्या बराच गदारोळ चालू आहे. आमच्या मते, पर्यावरण रक्षण आणि विकास या दोन्हीचा समतोल साधला जाणे गरजेचे आहे, मात्र त्याबाबत तर्कशुद्ध स्पष्टीकरण जावडेकर करू शकले नाहीत. हा तपशिलातील चर्चेचा विषय असल्याचे सांगून त्यांनी वेळ मारून नेली.