विद्यार्थ्यांवरील भार वाढणार नाही याची काळजी घेऊ- दर्डा Print

प्रतिनिधी, पुणे
पहिली ते आठवीच्या नवीन अभ्यासक्रम आराखडय़ावर आलेल्या सूचनांचा आणि आक्षेपांचा सारासार विचार करून त्यानुसार आराखडय़ामध्ये सुधारणा करण्यात येईल. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा भार वाढणार नाही याची काळजी घेतली जाईल. यानुसार पहिली आणि दुसरीच्या पाठय़पुस्तक निर्मितीचे काम सुरू झाले आहे, असे शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी सोमवारी सांगितले. राज्य शैक्षणिक प्रशिक्षण परिषद आणि बालभारतीच्या नियामक मंडळाच्या बैठकीनंतर दर्डा बोलत होते. एनसीईआरटीने २००५ मध्ये तयार केलेल्या नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्कच्या आधारावर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद आणि विद्या परिषदेने  महाराष्ट्र राज्यासाठी पहिली ते आठवीचा अभ्यासक्रम नव्याने तयार केला आहे. या पैकी पहिली व दुसरीच्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षांपासून होणार आहे.