पू.पू. स्वामी गगनगिरी महाराज ट्रस्टच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना वह्य़ांचे वाटप Print

खोपोली, २३ ऑक्टोबर
खालापूर तालुक्यातील नंदनपाडास्थित सामाजिक बांधीलकीने कार्यरत असलेल्या सवरेदय ग्राम परिवर्तन मंडळाच्या पुढाकाराने व खोपोलीतील प.पू. स्वामी गगनगिरी महाराज ट्रस्टच्या सहकार्याने १० ऑक्टोबर रोजी पेण तालुक्यातील गागोदे बुद्रुक, विनोबानगर, गावडोशी, घाटे, जांभूळवाडी तसेच खालापूर तालुक्यातील वावोशी कातकरवाडी येथील जिल्हा परिषद संचालित प्राथमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या एकूण १४५ आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थिनींना सवरेदय ग्राम परिवर्तन मंडळाचे अध्यक्ष प्रमोद पाटील, दत्तात्रय डाईत, संदीप पाटील, ज्योतीताई पोवळे, वरसईचे माजी सरपंच गजानन गुरव व अन्य मान्यवरांच्या हस्ते प्रत्येकी २०० पानी पाच वह्य़ांचे संच वाटप करण्यात आले, अशी माहिती सवरेदय ग्राम परिवर्तन मंडळाचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी दिली. मंडळ प्राधान्याने रायगड जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात कार्यरत आहे. आदिवासी महिला बचत गट, युवक गट, शेतकरी गट तयार करणे, आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे, पाणलोट क्षेत्रांचा विकास करणे इत्यादी विधायक उपक्रम सवरेदय ग्राम परिवर्तन मंडळातर्फे राबविण्यात येतात. डोंगराळ व आदिवासी भागातील उपरोल्लेखित शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना वह्य़ांची नितांत गरज असल्याचे निदर्शनास आले. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी खोपोलीतील प.पू. स्वामी गगनगिरी महाराज ट्रस्टचे प्रमुख तथा आश्रमाचे उत्तराधिकारी आशीषभाई वजीर यांची भेट घेतली. त्यांनी तात्काळ होकार दिला. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ट्रस्टतर्फे विनामूल्य ९०० वह्य़ा उपलब्ध करून दिल्यामुळेच या आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजेची पूर्तता करता आली असा खुलासा प्रमोद पाटील यांनी केला. गोरगरीब व आर्थिक दुर्बल घटकांसाठी ट्रस्टतर्फे सढळ हस्ते मदत उपलब्ध करून देणारे ट्रस्टी आशीषभाई वजीर यांच्याबद्दल प्रमोद पाटील यांनी शेवटी कृतज्ञता व्यक्त केली.