कोकण विद्यापीठाच्या मागणीला पाठिंबा Print

खास प्रतिनिधी , रत्नागिरी  
येथील शैक्षणिक क्षेत्रातून करण्यात आलेल्या स्वतंत्र कोकण विद्यापीठाच्या मागणीला ‘झी २४ तास’ या मराठी वृत्तवाहिनीतर्फे पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी या आघाडीच्या शिक्षणसंस्थेने शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी ‘वाचू आनंदे’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांच्या संग्रहाचे प्रकाशन या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांच्या हस्ते नुकतेच झाले. या प्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. विलास पाटणे यांनी कोकणातील महाविद्यालयांची वाढती संख्या लक्षात घेता या विभागासाठी स्वतंत्र विद्यापीठाची गरज व्यक्त केली. तो धागा पकडून डॉ. निरगुडकर यांनी या मागणीला आपल्या वृत्तवाहिनीतर्फे संपूर्ण पाठिंबा व्यक्त केला. तसेच संस्थेने सुरू केलेल्या ‘वाचू आनंदे’ या उपक्रमाबद्दल अभिनंदन करून ते म्हणाले की, जगात सुमारे दहा हजार बोली भाषा असून त्यात मराठीचा सातवा क्रमांक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या भाषावृद्धीसाठी मोलाचे योगदान दिले. इंग्रजांनी इंग्लिश भाषा जाणीवपूर्वक जोपासून तिचा विकास केला. भाषा आणि लिपी ही शैक्षणिक विकासाची माध्यमे आहेत हे लक्षात घेऊन मराठीच्या जतन-संवर्धनासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.
कार्यक्रमामध्ये शिवाजी पवार (केळये हायस्कूल), शर्मिष्ठा देसाई (जीजीपीएस) कस्ती शेख (जांभेकर विद्यालय) आणि कस्तुरी भागवत (शिर्के प्रशाला) या विद्यार्थ्यांनी आपण वाचलेल्या पुस्तकांबाबत मनोगत व्यक्त केले. कार्याध्यक्ष अ‍ॅड. पाटणे यांनी हा उपक्रम म्हणजे निरंतर चालणारी चळवळ असल्याचे नमूद करून संस्थेच्या शाळा-महाविद्यालयांचा त्यामध्ये उत्तम सहभाग असल्याचे नमूद केले. प्रा. श्रद्धा राणे यांनी प्रास्ताविक, तर अ‍ॅड. प्राची जोशी यांनी आभारप्रदर्शन केले. प्रा. दत्तात्रय वालावलकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.