करी कृपेची साऊली ! Print

सुहास सरदेशमुख, औरंगाबाद ,बुधवार, २४ ऑक्टोबर २०१२
alt

रात्रभर सुरू असणारा आई राजाचा उदोकाराचा गजर पहाटे तीन-साडेतीनच्या सुमारास टिपेला जातो. नगरहून अनेक तरुण भाविक पलंग पालखी घेऊन येतात. कुंकू उधळले जाते. देवीच्या मूर्तीसह मंदिराची प्रदक्षिणा सूर्योदयापूर्वी होते. सूर्याची किरणे मंदिरात दाखल होतात, तेव्हा सीमोल्लंघन झालेले असते. सीमोल्लंघनानंतर नगरहून आणलेल्या पलंगावर आई भवानी निद्रा घेते. या निद्रेला सुखनिद्रा म्हणतात. हा विलोभनीय सोहळा पाहण्यासाठी तुळजापुरात मोठी गर्दी असते.


दसऱ्याच्या दिवशी पहाटे मंदिरात मोठा हलकल्लोळ असतो. पलंग पालखी मिरवीत आलेले तरुण भक्त कल्लोळ तीर्थाजवळील पायऱ्यांजवळ येतात. हा भाग कमालीचा धोक्याचा. हजारो तरुण तेथून एकाच वेळी पायऱ्या उतरतात. तेव्हा कोणाचा तरी तोल जाईल आणि चेंगराचेंगरी होईल, अशी भीती मनात धरून बंदोबस्तावरील पोलीस शिट्टय़ा वाजवत असतात. गडबड करू नका, सावकाश उतरा अशा सूचना दिल्या जातात. एक जथ्था उतरतो, पुन्हा उदोकार होतो. संबळाचे आवाज वाढत जातात. सीमोल्लंघनाच्या सोहळय़ात सहभागी होण्यासाठी आलेल्या अनेकांच्या हातात पोत असतात. लक्ष दिव्यांची जणू आरासच. मंदिराच्या गाभाऱ्यातूनच मूर्ती उचलून ठेवण्यापूर्वी साडय़ांची साखळी केली जाते. मूर्तीला १०८ साडय़ांमध्ये गुंडाळले जाते. पुन्हा गजर होतो, आई राजा उदो उदोचा.
गाभाऱ्यातून मूर्ती पालखीत आणल्यानंतर एकच हलकल्लोळ होतो. नगरचे पलंग पालखीचे मानकरी आणि तुळजापूरचे भोपे पुजारी यांच्या साक्षीने होणाऱ्या या सोहळय़ात मंदिर संस्थानाचे अधिकारी सहभागी होतात. मंदिराभोवती होणाऱ्या या प्रदक्षिणेत कोणाला चालावे लागतच नाही. गर्दीचा रेटा एवढा असतो, की आपोआप प्रदक्षिणा होते. मंदिरातील एका पारावर पालखी विसावते. तेव्हा प्रसाद वाटला जातो. कोणीतरी घाईत आरती करून घेतो. नगारे, संबळ वाजत असतात. पुन्हा एकदा आरती होते आणि मुक्तपणे कुंकू उधळले जाते. एवढे, की मंदिराचा प्रत्येक कानाकोपरा लालेलाल असतो. हा सोहळा जणू युद्ध जिंकल्यानंतरचा उन्मादी आनंदच असतो.
युद्धदेवतेच्या चरणी सुरू असणारा हा सोहळा रोमहर्षक असतो. या वेळी देवीचा जुना पलंग विसर्जित करण्याची प्रथा आहे. होमकुंडात हा पलंग तोडून टाकण्यासाठी तरुण सरसावतात. कोणत्याही हत्याराशिवाय पलंगाचे तुकडे करून त्याचे तुकडे होमकुंडात विसर्जित होतात. पलंग पालखीचा हा मान नगरच्या तेली समाजातील एका व्यक्तीकडे आहे. पिढय़ान्पिढय़ा परंपरा सांभाळणारे अनेक जण. विजयादशमीचा हा सोहळा भल्या पहाटे सुरू होतो. त्यानंतर आई जगदंबेचे दर्शन घेता येते. विश्वाची जननी असणाऱ्या आई जगदंबेच्या चरणी हजारो भाविकांचा लोंढा आणखीही काही दिवस अलोट गर्दी करेल. पण चांगल्या-वाईटाची वैचारिक घुसळण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सीमोल्लंघन कसे होईल? दुष्टांच्या निर्दालनासाठी नाथांच्या भारुडाचा आवाज समूहगान व्हावा, त्यातून नव्या जाणिवा विकसित व्हाव्यात, यासाठीच म्हणू या- बये, दार उघड! १६व्या शतकात, बहमनी राजवटीत नाथांनी रचलेले हे भारूड आजही संदर्भहीन झालेले नाही, असेच म्हणावे लागेल-
बया दार उघड बया दार उघड।
अलक्षपूर भवानी दार उघड बया।
माहूर-लक्ष्मी दार उघड बया।।
कोल्हापूर लक्ष्मी दार उघड बया।
पाताळ लक्ष्मी दार उघड बया।।
कानाड लक्ष्मी दार उघड बया।
दार उघड बया दार उघड।।
उदो उदो असा शब्द गाजतो।
कामक्रोध दैत्यांवर कोरडा
कडकडा वाजतो।।
ज्ञानपोत पाजळतो। बोध परडी हाती घेतो।
बया दार उघड बया दार उघड।।
एका जनार्दनी माऊली।
 करी कृपेची साऊली।।